कुठे जेवणात आढळते अळ्या तर कुठे गोम; वाचा विलगीकरणातील संतापजनक प्रकार...

The larvae are found in the food
The larvae are found in the food
Updated on

अमरावती-यवतमाळ : कोरोना विषाणुमुळे नागरक भयभीत झाले आहेत. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. अशाही स्थितीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. मौजमस्ती, फेरफटका मारण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडत आहे. यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावला आहे. दुसऱ्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच परिसरच सील केलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये विलगीकरण केंद्राविषयी मोठी भीती आहे. निव्वळ संशय किंवा प्रवसातून क्‍वारंटाईन होण्यापेक्षा कोरोना झाला तर बर होईल असे नागरिक एकमेकांना म्हणत असतात. कारण, विलगीकरण कक्ष, तेथील दुरावस्थ, असुविधा या सर्वांना माहीत आहे. अशा ठिकाणी राहण्यापेक्षा कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात राहणे चांगले होईल, असे म्हणून लोक विलगीकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. यात आणखीच भर पडली आहे. कारण, विलगीकरणातील दोन किळसवाण्या घटना विदर्भात घडल्या आहेत.

अमरावती : एकीकडे अमरावतीच्या अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे नगरपालिकेकडून क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत आहे. विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या ताटात चक्क अळ्या निघत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. 

दोन-तीन दिवसांपूर्वी अग्रसेन भवन येथे क्वारंटाइन असलेल्या महिलेच्या ताटात अळ्या निघाल्याने त्यांनी ती बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या भातात काहीतरी कीटक निघाले असल्याच्या तक्रारी झाल्या. त्या दिवसापासून क्वारंटाइन असलेले काही नागरिक स्थानिक नातेवाइकांमार्फत घरूनच जेवणाचा डबा मागावीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका नागरिकाने जेवणात अळ्या निघाल्याचा फोटो नगरसेवक तसेच मीडियावर चित्र पाठवताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने क्वारंटाइन सेंटरच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी पुढे येत आहे. दोन-तीन दिवसांआधी जेवणाबाबत तक्रारी होत्या. मात्र, ज्या दिवशी जेवणात काही निघाल्याची तक्रार झाली, त्याच दिवसापासून जेवण पुरवठादार बदलवण्यात आला आहे. आता नवीन पुरवठादार जेवण पुरवत आहे. सध्याचे जेवण चांगले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

संबंधितांजवळ मौखिक तक्रार 
अग्रसेन भवनला जेवणाचा डब्बा घेऊन गेलो असता क्वारंटाइन असलेल्या महिलेच्या सकाळच्या जेवणात अळ्या निघाल्या होत्या व रात्रीच्या जेवणातही काही तरी निघाल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात संबंधितांजवळ मौखिक तक्रारदेखील केली होती. 
- राकेश तेजवानी, 
नागरिक, परतवाडा

अळ्या निघाल्याचे फोटो व्हॉट्‌सऍपवर पाहिले 
क्वारंटाइन असलेल्या नागरिकांच्या जेवणात अळ्या निघाल्याचे फोटो व्हॉट्‌सऍपवर पाहिले. ही बाब गंभीर आहे. क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींचा विश्‍वास बसावा, असे कार्य अधिकाऱ्यांनी करावे. 
- संजय तट्टे, 
आरोग्य सभापती, अचलपूर

यवतमाळ : मागील एक महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात शासकीय यंत्रणेकडून बैठका घेण्यात येत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह व हायरिस्क कॉन्टॅक्‍ट संशयितांना वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मेडिकल प्रशासनाकडून करण्यात येतो. कोविड सेंटरमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सायंकाळच्या जेवणात गोम आढळली. बाधिताने तत्काळ फोटो व व्हिडिओ काढून अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती यांच्या मोबाईलवर पाठविल्याने हा प्रकार समोर आला.

प्रा. प्रजापती यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करून हा प्रकार लक्षात आणून दिला. सहा एप्रिल रोजीदेखील जेवणात अळी निघाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर जेवणाचा दर्जा काही प्रमाणात सुधारण्यात आला होता. मात्र, पुन्हा "जैसे थे' स्थिती निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून, पौष्टिक आहाराचे बारा वाजल्याचा आरोप केला जात आहे. 

दोषींवर होईल कारवाई 
वैद्यकीय महाविद्यालयात कोरानाबाधितांची पुरेपूर काळजी घेतली जाते. जेवणासंदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. आर. पी. सिंह, 
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

...अन्यथा न्यायालयात जाणार 
पॉझिटिव्ह रुग्णांना गोम असलेले जेवण मिळणे चिंताजनक आहे. बाधितांनी फोटो काढून व्हॉट्‌स ऍपवर पाठविले. जिल्हाधिकारी व अधिष्ठातांकडे या प्रकाराची तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही. 
- प्रा. डॉ. प्रवीण प्रजापती, 
सदस्य, अभ्यागत मंडळ, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.