पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेतले जाते. शेतातील मळणी झाल्यावर आलेले पीक घरी नेण्यासाठी गोणपाटाचा वापर केला जातो. सध्या महाराष्ट्रात गोणपाट व्यवसाय हा पोंभुर्णा शहरात आहे. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे हा व्यवसाय अखेरची घटका मोजत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर, वर्धा, इचलकरंजी, सावली, मालेगाव आणि पोंभुर्णा हे ठिकाण विनकरीसाठी प्रसिद्ध होते. पोंभुर्णा येथे लुगड, धोतर आणि खादी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते. त्या काळात याची चांगली मागणी होती. पण भारतात इंग्रजांनी पाय रोवले.
वस्त्रोद्योग क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. ठिकठिकाणी इंग्रजांनी कापड गिरण्या तयार केल्या. कापड गिरण्यातील कापड हा स्वस्त दरात मिळत होता. आता हातमागावर तयार कपडे महाग होत होते. ते लोकांना पसंतीस उतरत नव्हते. यामुळे हातमागावर कापड बनविणे आता बंद झाले होते.
अशातच १९३० ते ४० च्या दरम्यान येथील काही कामगार हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, वणी या ठिकाणी कामाला गेले. तिथे अनेक दिवस काम केल्यानंतर सावकाराकडून त्यांना धान्य मिळाले. ते धान्य कसे न्यायचे याची चिंता त्यांना होती. सावकाराकडून त्यांना जुना असलेला गोणपाट मिळाला. या गोणपाठाचे त्यांना थोडेफार नवल वाटले.
याची माहिती घ्यायची म्हणून धोंडुजी वाळके, गोविंदा भसारकर, पुणाजी वनकर यांनी सावकाराला विचारले असता गोणपाट मध्यप्रदेश येथून आणल्याची माहिती त्यांना मिळाली. हे सगणे गावात आले. सामानाची जमवाजमव करून गोणपाट बनवण्यासाठी तयार झाले. नागपुरात जाऊन गोणपाटाला लागणारे साहित्य आणून त्यांनी व्यवसाय सुरू केला.
प्रारंभी गोणपाट बनवताना त्रास झाला. मात्र, सवय झाल्याने हा त्रास हळूहळू कमी झाला. त्यांचे पाहून गावातील अनेकांनी गोटपाट व्यवसाय सुरू केला. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड या ठिकाणाहून गोणपाटाची मागणी होऊ लागली. पोंभुर्णा शहरातील शेकडो कुटुंबाला या व्यवसायाने आर्थिक आधार मिळवून दिला.
आता शेतकऱ्यांनी मळणीच्या प्रक्रियेत बदल केला. बैलबंडीची जागा थ्रेशरने घेतली. त्यात पोत्यांचा वापर सुरू झाला. परिणामी गोणपाटाचा व्यवसाय संकटात सापडला. कोरोना महामारीने अनेकांचे कंबरडेच मोडले. याचा फटका गोणपाट व्यवसायालाही बसला. यावर्षी गोणपाट जास्त बनविण्यात आले नाही. या व्यवसायासाठी बॅंक कर्ज देत नाही. शासनाची भूमिकाही उदासीन आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.