लाखांदूर (जि. भंडारा) : मी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व चुलबंद आणि वैनगंगा नदीच्या मध्य भागात वास्तव्यास असलेला आवळी बेट बोलतोय. माझ्या अनेक समस्या गेल्या तीन पिढ्यांपासून कायम आहेत. त्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे माझ्या गर्भात पाळणाऱ्या मानवी जीवजंतूंना कसातरी मी पोसतो आणि रोजचे रहाटगाडगे चालवतो. अनेक असुविधांमुळे येथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागतात. माझ्या नावाचा साधा फलकही येथे नाही. एवढी वाईट स्थिती आहे. तरीही माझ्या आश्रयाला येणाऱ्या मानवी जीवाला सोबत घेऊन त्यांना जगवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदीच्या मध्यभागात मी वास्तव्य करतो. माझे नाव आवळी बेट म्हणून सर्वत्र परिचित आहे. माझी लोकसंख्या 450 असून 80 कुटुंब वास्तव्याला आहेत. पहिली ते चौथीपर्यंत जि.प. प्राथमिक शाळा असून, 25 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निसर्गाने नटलेल्या वातावरणात असल्याने माझ्याकडे अनेक जण आकर्षित होतात. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या कुतूहलाने मला पाहण्यासाठी येतात. 1942 व 1954 मध्ये दोन्ही नद्यांना महापूर आले होते. तेव्हा माझ्या आश्रयाला असणारे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हा शासनाने 1962 मध्ये माझ्यावरील आश्रितांचे पुनर्वसन इंदोरा येथे केले.
काही लोकांनी मला सोडले. मात्र, काही लोक माझ्यावर जीवापाड प्रेम करीत असल्याने मला सोडायला तयार नाहीत. माझा परिसर अंदाजे 400 एकराच्या जवळपास आहे. माझ्या परिसरातील माती काळी कसदार असल्याने या ठिकाणी अनेक जण विविध पिके घेऊन पोटाची खळगी भरतात. माझ्या सभोवताल असलेली वैनगंगा नदी बारमाही वाहते. दुसरी चुलबंद नदी पावसाच्या दिवसात ओथांबून वाहते. त्यामुळे चार महिने माझ्या आश्रयाला असणाऱ्या लोकांना व शाळकरी मुलांना डोंग्याचा वापर करून ते लोक जीव मुठीत घेऊन माझ्या ठिकाणाहून सोनीला जातात.
सोनी येथील लोकांच्या शेतजमिनी माझ्या आश्रयाखाली असल्याने त्यांना या चार महिन्यात जीव मुठीत घेऊन डोंग्याने प्रवास करावा लागतो. माझ्या आश्रयाला असणाऱ्या शाळकरी मुलांना चौथ्या वर्गानंतरच्या शिक्षणासाठी सोनी व वडसा येथे जावे लागते. शेतकऱ्यांना चुलबंद नदीपात्रातून डोंग्याने ये-जा करावी लागतो. सोनी येथील श्रीकृष्ण कुंबले, पांडुरंग कुंभले, ईश्वर कुंबले, नारायण कुंभले हे कुटुंब तीन पिढ्यांपासून आहेत. डोंगे चालवणारे व्यक्ती वर्षातून एकदाच धान मळणीच्या वेळी दान घेत असतात. इतर दिवशी कुणाकडूनही पैसे न घेता पावसाच्या दिवसात अविरत सेवा देत असतात.
येथील डोंगे गेल्या अनेक पिढ्यांपासून असल्याने मोडकळीस आले आहेत. यातून प्रवास करणे म्हणजे धोक्याची घंटा आहे. यासंदर्भात प्रशासनाला नवीन डोंगे द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे डोळेझाक केली होती. याची दखल घेत माजी जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी स्वतःच्या निधीतून डोंगा दिला. त्याचे नाव "आवडती' असे ठेवण्यात आले.
सन 2005 मध्ये महापुरात मी पूर्णपणे पाण्यात वेढलो होतो. माझ्या आश्रयाला असणाऱ्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नाना पटोले यांच्या मदतीने बाजार समिती येथे लोकांना आणले. 1962 मध्ये माझे पुनर्वसन इंदोरा येथे करण्यात आले. तरी माझ्या आश्रयाला असणाऱ्या लोकांनी मला न सोडण्याचा निश्चय घेतल्याने आजही ही अनेक समस्या असतानाही लोकांनी मला सोडले नाही. स्थानिकांनी सोनी ते माझ्यापर्यंत नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेकदा रेटून धरली. मात्र, प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. विहीरगाव येथील भाजपचे कार्यकते जितेंद्र ढोरे पूल होण्यासाठी सातत्याने वरिष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे माझ्या आश्रयाला असणाऱ्या लोकं आजही ही डोंग्यातून प्रवास करून आपला संसार चालवीत असतात.
निसर्गाच्या सनिध्यात असलो तरी या कालावधीत माझ्या आश्रयाला असणाऱ्या लोकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करून घ्यावा लागतो. मात्र, माझ्या प्रेमापोटी मला सोडायला तयार नाहीत. इंदोरा येथे शेतजमीन मिळाली, घरे बांधण्यासाठी जागा मिळाली. मात्र ते जायला तयार नाहीत. आवळी बेट हे आमचे जन्मगाव आहे. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो असल्यामुळे आम्ही आवळी या गावाला सोडणार नाही, असा हट्ट आजही कायम आहे. मात्र, प्रशासनाने पाहिजे त्या प्रमाणात सोयी-सुविधा न दिल्याने नागरिकांना दारिद्य्रात जीवन जगावे लागते.
माझ्या आश्रयाला असणारे लोक चांगले उच्चपदावर नोकरी करीत असून, अनेक विद्वान माझ्या आश्रयात जन्माला येत आहेत. म्हणून मला सोडायला तयार नाही. माझ्या बाजूलाच दोन्ही नद्यांचा संगम आहे. त्यामुळे उन्हाळ्यात खूप लोक मला पाहायला येत असतात. माझा अश्रय सोडू नका व मला एकटे पाडून जाऊ नका. माझा संपूर्ण विकास करून येथील लोकांचा उद्धार करा. तरच मी माझा भाग्यवान होईन. असा माझा हट्ट आहे. माझ्या ठिकाणाला येण्यासाठी पूल बनवा. असा टाहो मी प्रशासनापुढे मांडत आहे.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.