रुग्णाला वृक्षाखाली झोपवून सापाचे विष उतरवून दाखवा अन् २१ लाख मिळवा; अंनिसचे आव्हान

maharashtra andhashraddha nirmulan committee challenged to people regarding superstition in sironcha of gadchiroli
maharashtra andhashraddha nirmulan committee challenged to people regarding superstition in sironcha of gadchiroli
Updated on

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्‍यातील कोपला गावातील एक वृक्ष समाजमाध्यमांमध्ये खूप गाजला होता. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या वृक्षाखाली ठेवल्यास सापाचे विष उतरते, असा दावा या गावातील नागरिक करत आहेत. मात्र, याचे खंडन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांनी केले असून या वृक्षाची पाने हुंगवून सापाचे विष उतरवून दाखवा आणि 21 लाख रुपयांचे बक्षीस मिळवा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

सिरोंचा तालुक्‍यातील छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील आदिवासीबहुल कोपेला टोल्यात इंग्रजकालीन पडीत जुन्या विश्रामगृहात एक मोठा वृक्ष असून या झाडाखाली विषारी सापाचा दंश झालेल्या व्यक्तीला झोपविले असता विष उतरून रुग्ण बरा होतो, असे वृत्त पंचक्रोशीत पसरविले गेले. त्याची नोंद समाजमाध्यमांनीही मोठ्या प्रमाणात घेतली. पण, ही अफवा असून दिशाभूल करणारी, अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी माहिती प्रसारी झाल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व सर्प अभ्यासक उद्धव डांगे, सर्पमित्र विलास पारखी व कार्याध्यक्ष विलास निंबोरकर यांनी म्हटले आहे. या घटनेबाबत पानांचा गंध हुंगवून किंवा मंत्राने विषारी सापाचे विष उतरवून दाखवा व 21 लाख रुपये मिळवा, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केले आहे. आव्हान स्वीकारणाऱ्या व्यक्तीने कायदेशीर हमीपत्र लिहून दिल्यानंतर त्याला विषारी सर्पदंश करवून घेतला जाईल व त्याने कथित झाडाखाली झोपून स्वत:चा जीव वाचवून दाखवावा व 21 लाखांचा पुरस्कार जिंकावा, असे महाराष्ट्र अंनिसने म्हटले आहे. 

विषारी सापाचा दंश झालेल्या रुग्णास फालतू मंत्रोपचार, झाडाखाली झोपविणे, वनौषधीची पाने हुंगविणे, कोंबडी लावणे यासारखे निरुपयोगी उपचार करण्यापेक्षा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रतिजैवविष औषध (अँटी स्नेक व्हेनम सिरम) देणे शहाणपणाचे असते, असेही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.

वैज्ञानिक खुलासा -
कोपेलातील चमत्कारिक घटनेचा वैज्ञानिक खुलासा करताना महाराष्ट्र अंनिसने म्हटले आहे की, मानसिक आधार दिल्याने विषारी सापाचे विष उतरत नाही फक्त मृत्यू कालावधी वाढतो. गडचिरोली जिल्ह्यात 257 साप बिनविषारी व फक्त 4 प्रकारचे साप विषारी आढळतात. त्यात नाग, मण्यार, फुरसे व घोणस यांचा समावेश होतो. साहजिकच बिनविषारी सापांच्या दंशाचे प्रमाण जास्त असते. बिनविषारी सापाच्या दंशाने व्यक्ती मरत नाही. त्यामुळे मांत्रिक, पुजारी, भूमका, गायता यांचे फावते . विषारी सापाने माणसाला चावण्यापूर्वी भक्ष्य पकडले असेल किंवा कुणाला चावला असेल, अशावेळी तो कुणाला चावला तर त्याला 'कोरडा दंश' असे म्हणतात. अशावेळी शरीरात विष ओतले जात नाही व मृत्यू होत नाही.  जर चाव्यात विष ओतले जात असेल तर त्याला 'ओला दंश' असे म्हणतात. अशा दंशात व्यक्तीचा मृत्यू होतो.  विशेष म्हणजे नागाचे 60 टक्‍के, घोणस 20 टक्‍के, तर मण्यार या विषारी सापाचे 20 टक्‍के दंश बिनविषारी  असतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()