यवतमाळ : राज्यात कोणतीही नियमित पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार नाही, अशी घोषणा वर्षभरापूर्वी राज्य सरकारने केली होती. मात्र या भूमिकेवरून घुमजाव करीत सरकारने पुन्हा कंत्राटी शिक्षक भरतीचे आदेश ऐन शिक्षक दिनी जारी केले आहेत. अवघ्या वर्षभरात सरकारने शब्द फिरविल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने सप्टेंबर २०२३ मध्ये एक जीआर काढून सरकारी कार्यालयातील रिक्त पदे कंत्राटाने भरण्याचा निर्णय घेतला होता. ही कंत्राटी भरती करण्यासाठी ९ एजन्सीजची निवडही केली होती. या निर्णयावरून विरोध झाल्यावर शासनाने नमते घेत कंत्राटी पदभरतीचा हा जीआर ऑक्टोबर २०२३ मध्ये रद्द केला. मात्र वर्ष लोटण्यापूर्वीच सरकारने आपला शब्द फिरविला आहे. गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी शाळांमधील शिक्षकांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २०२३ च्या प्रारंभापासून पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.