वर्धा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनासाठी आलेल्या प्रकाशन संस्थांच्या सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांना व्यवस्थेतील गैरसोयींमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
शुल्क भरून देखील संयोजकांनी निवास व्यवस्थाच केली नसल्याने खुल्या मैदानात उभारलेल्या पुस्तकांच्या गाळ्यांमध्ये बोचऱ्या थंडीत झोपण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली, तर संमेलनपूर्व तयारीसाठी दोन दिवस अगोदर दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची सोयही करण्यात आली नाही.
त्यामुळे संमेलन नगरीत प्रकाशक वाऱ्यावर, असे चित्र यंदा आहे. साहित्य संमेलनात दरवर्षी ग्रंथ प्रदर्शनात राज्यभरातील प्रकाशन संस्था सहभागी होत असतात. आजवर या प्रदर्शनासाठी आलेल्या प्रकाशन संस्थांच्या किमान दोन कर्मचाऱ्यांची सशुल्क व्यवस्था संयोजक करत होते. यंदाही प्रकाशन संस्थांना सात हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आले.
मात्र त्यात एकाच कर्मचाऱ्याची आणि ती देखील केवळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रदर्शनातील २९० गाळ्यांच्या सुमारे ५८० कर्मचाऱ्यांचे हाल झाले. ‘व्यवस्थेसाठीचे शुल्क भरूनही निवास व्यवस्था होणार नसल्याचे कळले. संमेलनस्थळी आल्यानंतर ही बाब संयोजकांनी सांगितली आणि प्रदर्शनाच्या गाळ्यांमध्येच राहा, असे धक्कादायक उत्तर दिले.
याची कल्पना नसल्याने आम्ही पूर्वव्यवस्थाही केली नव्हती आणि शहरातील सर्व हॉटेल्स, धर्मशाळा, लॉज यांचे बुकिंगही संपले होते. त्यामुळे अखेर पुस्तकांच्या गाळ्यातच रात्र काढली’, अशी कैफियत प्रकाशकांनी ‘सकाळ’कडे मांडली. माझ्यासह ६५ वर्षांचे एक ज्येष्ठ सहकारी देखील आहेत. आम्ही दोघेही आमच्या प्रदर्शनाच्या गाळ्यातच झोपलो.
संयोजकांनी अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी चादरही पुरवण्यात असमर्थता दर्शवली. सकाळी आन्हिकांसाठी संमेलन स्थळाच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत जावे लागले. प्रदर्शनाच्या तयारीसाठी दोन दिवस अगोदर आलो होते, मात्र त्या दिवसांत भोजनाची व्यवस्थाही झाली नाही. - शंकर बोबडे, नाथे पब्लिकेशन्स - नागपूर
प्रकाशकांकडून आकारलेल्या शुल्कातून शक्य होईल, त्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. काही ठिकाणी निवास व्यवस्थाही होती. संबंधितांनी चौकशी केली असती, तर काहीतरी मार्ग काढता आला असता. विसंवादातून हे झाले आहे.
- नरेश सबजीवाले, समन्वयक - ग्रंथ प्रदर्शन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.