गावातील वाद पुन्हा पोलिस ठाण्यात, आर. आर. पाटलांनी सुरू केलेल्या योजनेचे तेराव्या वर्षातच 'तेरावे'

mahatma gandhi tantamukt gaon scheme may closed due to negligence
mahatma gandhi tantamukt gaon scheme may closed due to negligence
Updated on

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : राज्यातील गावखेड्यात लहान, मोठे तंटे गावातच मिटवून गावपातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महत्वाची भूमिका बजावते. मात्र, याच योजनेला आता घरघर लागलेली आहे. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच या योजनेला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

गावातील तंटे गावातच मिटून गावकऱ्यांचा पैसा, पत व वेळ वाचण्यासाठी (स्व.) माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात कार्यान्वित असलेल्या या बहुआयामी योजनेला आघाडी सरकारमध्येच घरघर लागली होती. परंतु, महाविकास आघाडीत तरी नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेतील ही योजना गाव-खेड्यापासून आणखीच दूर लोटली गेली. त्यामुळे गावागावात समित्यांची निट बसलेली घडी विस्कळीत झाली असून मध्यंतरीच्या काळात गावसमिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेचही अनेक ठिकाणी पाहावयास मिळाली.

विशेष म्हणजे गृहविभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाट्याला असल्याने मरगळलेल्या या बहुआयामी योजनेला बुस्टर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. परिणामी, निधीचा वानवा, मार्गदर्शनाचा अभाव व राजकारणाचा शिरकाव यामुळे पुढील वर्षात मोहीमेचे विसर्जन होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मागील 10 वर्षाच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या योजनेची कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही हे विशेष. तर इतरही पुरस्कार रखडले आहेत. पुरस्कार रक्कमेच्या विनियोगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकास कामेही केली. परंतु, कामातील हे सातत्य जास्त काळ टिकले नाही. अन्‌ या गाव तंटामुक्‍त मोहिमेने प्रारंभीचे पाच वर्ष वगळता नंतर नांगी टाकली. त्यामुळे लहान सहान वाद-विवाद आता पुन्हा पोलिस ठाणे गाठत आहेत. 

गावातील शांततेसाठी ही योजना अत्यंत परिणामकारक आहे. आमचे गाव संवेदनशील असतानाही राज्याचा शांततेचा विशेष व तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त करून गावासाठी दहा लाख निधी प्राप्त केला होता. शासनाने नवीन वर्षात या योजनेला पुनर्जिवीत करावे, अशी अपेक्षा आहे.
-जैनुल सिद्दीकी, माजी अध्यक्ष, तंटामुक्त समिती, शेंबाळपिंपरी

गावातील वाद पुन्हा पोलिस ठाण्यात - 
राज्यातील गावखेड्यात लहान, मोठे तंटे गावातच मिटवून गावपातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेमुळे पोलिस ठाण्यात तक्रारी करण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पोलिसांचा भार काही प्रमाणात का होईना हलका झाला होता. आता या योजनेकडे झालेले दुर्लक्ष पुन्हा एकदा लहान-मोठ्या तंट्यांना जन्म देत आहेत. गावात या तंट्यांना सोडविण्यात येत नसल्याने आता पुन्हा नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेत आहेत. गावात भांडण-तंटेही वाढले आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.