जामली (जि. अमरावती) : जिल्हा परिषद अंतर्गत मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यातील पशुधन अधिकाऱ्यांची एकूण १८ पदे असताना आजघडीला धारणीत ३ व चिखलदरात २ डॉक्टर कार्यरत आहेत. १३ पशुधन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे येथील पशुधन शासनाने वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्न मेळघाटातील पशुपालकांना पडला आहे.
मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन तालुक्यांतील पशुधनाची संख्या दोन ते अडीच लाखांच्या घरात आहे. असे असताना चिखलदरा तालुक्याचे पशुधन अधिकारी हे प्रभारी आहेत तसेच त्यांच्याकडे अनेक गावांतील दवाखान्यांचा प्रभार आहे. डॉ. विजयकर यांच्याकडे टेम्ब्रूसोंडा, तेलखार व राहू या गावाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी कसरत करावी लागते, त्यातूनच कोणत्याही रुग्णालयात वेळेवर पोहोचणे त्यांना शक्य होत नाही.
पावसाळ्यात विविध आजारांनी सध्या तोंड वर काढले आहे. त्यात तोंडखुरी, पायखुरी, एक टांग्या, गर्भपात, हगवण, कावीळ, सर्दी, खोकला, ताप अशा रोगांनी पशुधन ग्रस्त आहे. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लसीकरण, जनावरांना टॅग लावणे तसेच सर्व माहिती ऑनलाइन करून शासनाला पाठविणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. पण शासनाला याची माहिती वेळेवर पोहोचत नसल्यामुळे पशुमालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
मेळघाटात व्याघ्रप्रकल्पातील जंगल असल्यामुळे येथे पाळीव प्राणी तसेच जंगली प्राणी यात नेहमी संघर्ष होत असून कित्येकदा वाघ, बिबटकडून पाळीव प्राण्यांना जखमी करण्यात येते किंवा त्यांची शिकार होत असते. त्याकरिता पशुधन मालकांना वनविभागाकडून नुकसानभरपाईची तरतूद आहे. पण पशुधन अधिकारी वेळेवर मिळत नसल्यामुळे मेलेल्या जनावरांचा मूल्यमापन करून जनावर किती रुपयांचा होता हा दाखला पाहिजे असतो. पण तो वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी या नुकसानभरपाईपासून सुद्धा वंचित राहतो. वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व त्वरित रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी आता मेळघाटात जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.