कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्‍सिजन सिलिंडरची केली व्यवस्था

oxygen
oxygen
Updated on

लाखनी (जि. भंडारा) ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळेवर ऑक्‍सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना प्राणास मुकावे लागत आहे. दररोज कानी पडणाऱ्या मृत्यूच्या बातम्या ऐकून शहरातील चार युवक अस्वस्थ झाले. त्यांनी अनोखी शक्कल लढवत अवघ्या चोवीस तासांच्या आत कोविड केअर सेंटरसाठी ऑक्‍सिजनची व्यवस्था करून दिली.

oxygen
लस मिळेल का लस? सोशल मीडिया ग्रुपवर एकमेकांना विचारणा; तुटवडा कायम

तालुका आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या वतीने समर्थ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता वसतिगृहात कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात आली. कोरोना विषाणूची दुसरी लाट थोपवून धरण्यासाठी तालुका पातळीवर हे ६० खाटांचे केंद्र सुरू झाले. मात्र, राज्यभरात असलेल्या ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे या केंद्रासाठी ऑक्‍सिजनची सोय होऊ शकली नव्हती. ही बाब शहरातील युवक संदीप भांडारकर, सचिन घाटबांधे, करण व्यास व प्रणय शामकुंवर यांच्या लक्षात आली. तालुक्‍यात कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रसार लक्षात घेता या अडचणीवर मात करण्यासाठी चौघांनीही काहीतरी करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी अनोखी शक्कल लढवत लाखनी तसेच आसपासच्या परिसरातील गॅस वेल्डिंग करणारे तसेच भंगार व्यावसायिकांकडील रिकामे सिलिंडर जमा करण्याचे ठरवले.

यासाठी चौघांनीही तहसीलदार मलिक विराणी यांची भेट घेतली. त्यांना ही कल्पना सांगितली व प्रशासकीय परवानगी मागितली. तहसीलदारांनीदेखील तेवढ्याच तत्परतेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधत खासगी व्यक्ती, गॅस वेल्डिंग व भंगार व्यावसायिक यांच्याकडील सिलिंडर अधिग्रहीत करण्याचे आदेश काढले. आदेश निघताच चारही युवकांनी शहर व परिसरातील सुमारे दहा सिलिंडर जमा केले. यात आरोग्य विभागाकडूनदेखील काही सिलिंडरची भर पडली.

उद्योजक मित्तल यांचा सेवाभाव

सर्व सिलिंडर जमा झाल्यानंतर मौदा येथील जगदंबा इंडस्ट्रिअल गॅसेसचे संचालक श्री. मित्तल यांच्याशी संदीप भांडारकर याने संपर्क साधून कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी ऑक्‍सिजन देण्याची विनंती केली. त्यांनीदेखील सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून तातडीने ऑक्‍सिजन भरून दिले.

प्रेरणादायी कार्य

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीव धोक्‍यात आले आहे. अशात समाजाचे ऋण फेडण्यासाठी या युवकांनी केलेली धडपड सर्वांना प्रेरणा देणारी आहे. एकत्रितपणे एखाद्या समस्येविरोधात लढल्यास नक्कीच मार्ग निघतो, हे यावरून सिद्ध झाले.

oxygen
मेडीकलचे वॉचमन रुग्णांना करतात दमदाटी; कोरोनाग्रस्तांच्या भावनांशी खेळ

सर्वसामान्य रुग्णांना दिलासा

तालुक्‍यातील पोहरा, बोरगाव, चिखलाबोडी, किन्ही आदी गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेकांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता भासत आहे. खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये जागा आणि ऑक्‍सिजन दोन्हीची कमतरता असल्याने कोविड केअर केंद्रात झालेली ही सोय अनेकांसाठी जीवन रक्षक ठरणार आहे, यात शंका नाही.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.