चांदूरबाजार (जि. अमरावती) : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा उत्तर प्रदेश पोलिसांनी सीमेवर धौलपूर जवळ रोखला. राज्यमंत्री बच्चू कडू नवी दिल्लीत दाखल होऊ नये म्हणून सर्व मार्ग पोलिसांनी बंद केल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी मोझरी येथून चार डिसेंबर रोजी केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्ली येथे निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहा दिवसांत दुचाकीने एक हजार किलोमीटरचा प्रवास केला. मोझरी, चांदूरबाजार मार्गे परतवाडा, बैतुल, भोपाळ, गुना, ग्वाल्हेर येथून ते भरतपूरला पोहोचले.
दररोज २०० किलोमीटरचा प्रवास करीत राज्यमंत्री बच्चू कडू स्वतः दुचाकी चालवीत शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचत आहेत. ग्वाल्हेर मार्गे उत्तर प्रदेशमधील पलवलला जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला.
पुढे आग्रा व इतर भागात चक्काजाम असल्याचे कारण यूपी पोलिसांनी पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास सांगितले. परंतु, भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग यूपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने भरतपूरलाच गुरुद्वारात राज्यमंत्री कडूसह शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांना जागोजागी समर्थन मिळत असल्याने उत्तर प्रदेश सरकारसुद्धा धास्तावले आहे.
बच्चू कडू यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रवेशच मिळू द्यायचा नाही, या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत. उत्तर प्रदेशात दाखल होत हजारो शेतकऱ्यांचा मथुरा-वृंदावनला मुक्काम होता. मात्र, पोलिसांना न जुमानता राज्यमंत्री बच्चू कडू भरतपूरला पोहोचले. तेथून उत्तर प्रदेश पोलिस पुढे जाऊ देत नसल्याने शेतकऱ्यांसाठी भरतपूर येथे रक्तदान करण्यात आले.
आंदोलनात आम्ही सहभागी होणारच
शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिस रोखत आहे. मात्र, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आम्ही सहभागी होणारच.
- बच्चू कडू,
राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य
संपादन - नीलेश डाखोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.