(व्हीडिओ) बांबू संवर्धनासाठी मेळघाटात केली जाते ही अनोखी पूजा

Moment of bamboo cultivation in Melghat through Bhavai Puja
Moment of bamboo cultivation in Melghat through Bhavai Puja
Updated on

धारणी (जि. अमरावती) : बांबू या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम राखली आहे. या महिन्यात भवई पूजेच्या माध्यमातून नव्या शेती हंगामाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

आदिवासी कोरकू समाज हा महिना "भवाई पूजा' महिना म्हणून साजरा करीत आहेत. या पूजेत गवळी, गौलाण, राठ्या यासह इतरही समाज सहभागी होतात. या पूजेपासून नवीन वर्षाला तसेच हंगामाला सुरुवात होते. या पूजेत बांबूला फार महत्त्व आहे.

बांबूची एक फांदी कापून प्रत्येक घरी आणतात. त्याची पूजा करतात. पूजा झाल्यावर हा बांबू शेती कामासाठी म्हणजे वखर, नांगरणी, बैलांना हाकण्यास तसेच वर्षभर शेतीचे काम करताना उपयोगात आणतात. या पूजेत पावसाला येण्याचे आवाहन केले जाते. कोणते पीक जास्त पेरावे, कोणते पीक कमी येणार, यांचा अंदाज बांधला जातो.

गावातील शेतीमजुरांना मजुरी किती रुपये द्यायची इत्यादी शेतीसंबंधी नियम केले जातात. यासोबतच वेगवेगळ्या बियाण्यांचे यानिमित्ताने पूजन केले जाते. विविध अन्नधान्याचे प्रकार सर्व घरातून एकत्र करून प्रत्येक कुटुंबाला शेवटी त्या बिजाचे वाटप गाव भूमकाबाबा यांच्या हस्ते करण्यात येते.


ज्वारी, बाजरी, गहू, धान, सूर्यफूल, मूग, भुईमूग, मका, चणा, मसूर, बरबटी, तीळ यांसह अन्य पिकांचे वाण या भवाई पूजेत ठेवण्यात येतात. बांबूसारखे भरभरून पिकू दे, वाढू दे, अशी प्रार्थना केली जाते. याच महिन्यात जागतिक जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला.

मेळघाटातील आदिवासी बांधवांना जागतिक दिवस माहिती नसले तरी अशा भवाई पूजा, काडीबुडी पूजेच्या निमित्ताने जंगलाची पूजा केली जाते. जंगलातून मिळणाऱ्या सेवांप्रती आभार व्यक्त केले जाते.
 

वनविभागाकडून बांबू लागवडीला प्रोत्साहन


कंजोली वनविभागाचे आगमुक्त जंगल या उपक्रमात सहभागी आहे. आजच्या तारखेपर्यंत कंजोली या गावालगतच्या जंगलाला आग लागलेली नाही. त्यामुळे भवाई पूजेनिमित्त वनविभागाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला दोन बांबूची रोपे देण्यात आली. धूळघाट रेल्वेचे रेंज ऑफिसर योगेश तापस यांनी बांबू रोपे वाटपासाठी पुढाकार घेतला. या वेळी वनपाल श्री. वानखडे उपस्थित होते.


 
बांबूची रोपे द्यावी
बांबू प्रजाती रोजच्या जगण्यात, विविध वस्तू बनविण्यास उपयोगी पडते. त्यामुळे बांबू प्रजातीचे संवर्धन करण्यास भवईपूजा सारख्या सांस्कृतिक संकल्पना लक्षात घेऊन वनविभागाने प्रत्येक गावाला पूजेनिमित्त बांबूची रोपे द्यावी. त्यातून गावागावांत, शेतात बांबू वाढेल आणि संरक्षित जंगलातील बांबू टिकून राहील.
- गीता बेलपत्रे, निसर्ग फाउंडेशन, मेळघाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.