अमरावती : कमी पटसंख्या असलेल्या शाळांची शासनाने यादी तयार केली आहे. कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे सध्या राज्यात जवळपास 1300 शिक्षक अतिरिक्त असून कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील जवळपास 10 हजारावर शिक्षक नव्याने अतिरिक्त होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्यांच्या समायोजनाचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकणार आहे.
राज्यात 10 ते 12 पेक्षा कमी पटसंख्येच्या साडेसतरा हजार शाळा असून त्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या चार हजार शाळांचा समावेश आहे. 20 पटापेक्षा कमी साडेतेरा हजार शाळा असून या शाळांमध्ये 29 हजार शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार या शाळांवरील जवळपास 10 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी राज्यातील 24 जिल्ह्यामधील तेराशे शिक्षक अतिरिक्त ठरले असून अद्यापही त्यांचे समायोजन झालेले नाही. कोरोनामुळे सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद असून पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पर्यायाने शिक्षक भरती सुद्धा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिक्षक समितीचा विरोध -
आरटीई कायद्यानुसार कोणतीही शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेला बंद करता येत नाही. मुलांना 1 ते 3 किलोमीटरच्या आतच शिक्षण मिळणे आवश्यक आहे. गाव, वाड्या वस्त्या, आदिवासी दुर्गम भागातील शाळा बंद करता येणार नाही. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शासनाला देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कशा सुरू राहतील, याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
असे आहेत जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक -
मुंबई 297, दक्षिण मुंबई 124, उत्तर मुंबई 188, ठाणे 93, रायगड 6, पुणे 22, कोल्हापूर 16, सोलापूर 17, सांगली 2, सिंधुदुर्ग 5,जळगाव 12, धुळे 70, नंदूरबार 33, नागपूर 182, चंद्रपूर 53, वर्धा 10, गोंदिया 36, औरंगाबाद 24, जालना 10, बीड 51, लातूर 41, उस्मानाबाद 18, अकोला 15, वाशिम 4
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.