मारेगाव (जि. यवतमाळ) : शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये राहणाऱ्या महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (वय ३०) व श्रुती उमेश उलमाले (वय दीड वर्षे) असे मृत आई व मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १९) रात्री घरी पती उमेश, पत्नी कोमल व दोन मुली नेहमीप्रमाणे झोपी गेल्या होत्या. उमेशला रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान जाग आली. तेव्हा खोलीत पत्नी व लहान मुलगी दिसत नसल्याने शोध घेऊन पोलिसात कळविले.
मात्र, कोमलचा शोध लागला नाही. दरम्यान, घराजवळ असलेल्या विजय थेरे यांच्या शेतातील विहिरीजवळ चपला आढळून आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. विहिरीत गळ टाकून शोधल्यानंतर मुलगी श्रुतीचा व नंतर आई कोमलचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूरलगत अर्धवट बांधकाम असलेल्या शटरच्या मागे अज्ञात व्यक्तीचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. श्रीरामपूरच्या सीमेवर पुसदनगर परिषदेच्या हद्दीत एका कॉम्प्लेक्सचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत असून गाळ्याच्या शटरच्या मागे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना कळविली. पोलिसांना तेथे ४२ ते ४५ वयोगटातील व्यक्ती पांढरा शर्ट व फिक्कट काळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख तूर्तास पटली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी नेरी-नवरगाव मार्गावर घडली. मोटेगाव येथील गोकुलदास मेश्राम दुचाकीने सहकाऱ्यासोबत गावाला जात होते. त्याचवेळेस मागाहून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने गोकुलदास यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाने वाहन सोडून पळ काढला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.