गोंदिया : उधार नेलेले ८० हजार रुपये परत करत नाही व कामावरही येत नाही, म्हणून मालकाने पत्नी, मुलगा आणि अन्य साथीदारांच्या मदतीने आपल्या वाहनचालकाचा खून करीत त्याचा मृतदेह गौतमनगर स्मशानभूमीला लागून असलेल्या झुडपी जंगलात खड्डा खोदून पुरला. २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा चार दिवसानंतर अर्थात २ आॅक्टोबरला उलगडा झाला. शांतनू अरविंद पशिने (वय ३६, रा. मोहगाव, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
६ ते ७ जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला आहे, अशी चर्चा ३० सप्टेंबर रोजी गौतमनगर येथील पानटपरीवर सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच त्याने ही माहिती पोलिस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत गोंदिया शहरचे ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली. त्यामुळे ठाणेदार पर्वते यांनी पोलिस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्या परिसरात कोणीही बेपत्ता असल्याची तक्रार किंवा तशी माहिती मिळून आली नाही.
दरम्यान, पानटपरीवर ज्या भागात ही चर्चा होती, त्या भागाची पोलिसांनी पाहणी केली. हा भाग झुडपी जंगल असल्याने व जंगली जनावरे असल्याने मृतदेह पुरल्याच्या ठिकाणाचा शोध घेणे शक्य होत नव्हते. तथापि, २ आॅक्टोबर रोजी ठाणेदार पर्वते यांनी सहकारी पोलिसांसह मध्यरात्री गौतमनगरस्थित स्मशानभूमीलगतचा झुडपी जंगल पिंजून काढला. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला.
मृताचा फोटो परीसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस (रा. गौतमनगर) याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून असल्याचे ओळखले. यावरून पोलिसांनी विक्रम बैस याच्याबाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैससोबत राहणारे अन्य तीन ते चारजणसुद्धा फरार असल्याचे चौकशीत दिसून आले.
शांतनू पशिने हा विक्रम बैस याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. त्याने विक्रम बैसकडून ८० हजार रुपये उधारी घेतले होते. कामावरसुद्धा येत नव्हता. त्यामुळे विक्रम बैस याने पत्नी, मुलगा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने शांतनूला गौतमनगर स्मशानभूमीस्थित झुडपी जंगल परिसरात नेऊन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारले. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला. ठाणेदार किशोर पर्वते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत.
मित्राने सांगितला हत्येचा घटनाक्रम
पोलिसांनी संशयावरून तपास करून विक्रम बैस याचा मित्र विकास ओमप्रकाश गजभिये याला ताब्यात घेतले. त्याने शांतनू पशिने याच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगून हत्येची उकल केली. गौतमनगर स्मशानभूमीस्थित झुडपी जंगल परिसरात शांतनूला नेऊन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारल्याचे तो पोलिस चाैकशीत म्हणाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरल्याचे त्याने सांगितले.
अशी आहेत आरोपींची नावे...
विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस (वय ३६), किरण विक्रम बैस (वय ३२), चित्ता विक्रम बैस (वय १९, सर्व रा. गौतमनगर, गोंदिया) अशी आरोपींची नावे असून, अन्य ३ ते ४ आरोपींचाही यात समावेश आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.