नागपूर :लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावाकडे जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे. या मजुरांना पोहचविण्यासाठी प्रशासनाने बस, रेल्वे ची सुविधाही सुरू केली आहे. अशात भेटीसाठी किंवा काही कामासाठी आप्तेष्टांकडे आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांनीही स्वगृही परतण्यासाठी धडपड चालविली आहे. कुणाचा पती एकटा आहे, कुणी आजारी आप्तेष्टना भेटण्याची परवानगी मागत आहे. माहेरी अडकलेल्या महिलांनाही आपल्या घरी परतायचे आहे. त्यासाठी अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे परत जाण्यासाठी अर्जही केला आहे.
टाकळी येथे आलेल्या महिलेचा पती गुजरातमध्ये नोकरीवर आहे. ती सध्या नागपूरला आईच्या घरी अडकली आहे. आईची प्रकृती गंभीर झाल्याने जानेवारी महिन्यात ती नागपूरला आली होती. त्यानंतर वहिनीचे बाळंतपण झाल्याने या दोघींची सुश्रूषा करण्यासाठी ती थांबली. फेब्रुवारी महिना उलटल्यावर गुजरातला परतण्यासाठी तिने रेल्वेचे आरक्षण केले. १७ ला तिचे आरक्षण निश्चित झाले. मात्र यादरम्यान ऐकलेल्या उलटसुलट चर्चांमुळे ती घाबरली आणि जाणे रद्द केले. पुढे लॉकडाऊन लागले. आज सुटेल, उद्या सुटेल या प्रतीक्षेत दीड महिना लोटला. सरकारने आता पुन्हा मुदत वाढविल्याने ती अस्वस्थ झाली आहे. गुजरातला पती एकटे आहेत, सासर दूर आहे, त्यामुळे पतीचे जेवणाचे प्रचंड हाल होत असल्याचे तिने सांगितले. दरम्यान संतापलेल्या पतीने तिचा फोन स्वीकारणे बंद केल्याने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची भीती महिलेने व्यक्त केली. त्यामुळे तिची गुजरातला जाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. ही महिला प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशाप्रकारचे अनेक विनंती अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे प्रवास करण्यासाठी 15 हजाराच्या वर अर्ज आले आहेत.
यात ८० टक्के मजूर तर इतर सामान्य नागरिकांचा समावेश आहे. अनेकजण काही कामस्तव, कार्यक्रमासाठी किंवा भेटण्यासाठी शहरात आले होते व या काळात टाळेबंदी लागल्याने ते अडकले. टाळेबंदीचा काळ सतत वाढत असल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे मजूर व विद्यार्थ्यांसाठी परवानगी येताच अशा अडकलेल्या लोकांची परतीसाठी धावपळ चालली आहे. काहींना नागपूरबाहेर जायचे आहे तर काही स्वगावी जाण्यास धडपडत आहेत. कुणाला आपल्या आजारी आईवडिलांना किंवा गंभीर आजारी नातेवाईकांना भेटायचे आहे तर कुणी मुलीच्या बाळंतपणाला जाण्याची परवानगी मागत आहेत. अनेकांना शहरातून गावाकडे जाण्याची इच्छा आहे. अनेकांनी हास्यास्पद कारणे दिली आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे नातेसंबंध ताणले गेले आहेत. या अडकलेल्या लोकांची प्रशासन कशाप्रकारे व्यवस्था करते, हे पाहण्यासारखी ठरेल.
इतर राज्यातील लोक जसे महाराष्ट्रात अडकले आहेत तसे महाराष्ट्रातील लोकही इतर राज्यात अडकले आहेत. दिल्ली, किंवा सुरत, अहमदाबादला व्यवसाय, कार्यालयीन कामास गेलेले अनेक लोक टाळेबंदी लागल्याने तिथेच अडकले. अशा नागरिकांचाही जीव टांगणीला लागला आहे. विद्यार्थी व मजुराप्रमाणे अशा अडकलेल्यांनाही आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.