नागपूर : क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनापोटी कर्जबाजारी झालेल्या २० वर्षीय युवकाने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. पोटच्या मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या आईनेही फिनाईल पिऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी उघडकीस आल्यामुळे समाजमन हेलावले.
लकडगंज परिसरातील छापरू लोक बिल्डिंगमध्ये घडलेल्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. खितेश नरेश वाघवानी ऊर्फ वाधवानी (वय २०) आणि त्याची आई दिव्या नरेश वाघवामी (वय ५१) असे आई-मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खितेन हा मुक्तविद्यापीठातून बी.कॉम. प्रथम वर्षाला शिकत होता.
त्याची २९ मे पासून परीक्षा होती. त्याचे वडील नरेश यांचा इतवारी येथे किराणा व्यावसायिक आहे. हितेशला क्रिकेट सट्ट्याचे व्यसन होते. तो सातत्याने क्रिकेट सट्ट्यामध्ये पैसे लावायचा. त्याचे व्यसन इतके वाढले होते की, त्यात तो २० लाख रुपये हरला होता. त्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले होती.
एक आठवड्यापूर्वी पैसे न दिल्याने काही सट्टेबाजांनी खितेशला मारहाण केली होती. त्यामुळे तो तणावात राहायचा. रविवारी (ता.२१) सकाळी आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांकडे लग्नाला गेले असताना, त्याने दुपारी पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान दुपारी तीन वाजताच्या सुमारास आई-वडील आणि नातेवाईक घरी आले असता ही घटना उघडकीस आली. फास काढून नातेवाइकांनी खितेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान खितेशच्या मृत्यूमुळे त्याची आई दिव्या प्रचंड हादरली. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. त्यामुळे रविवारपासून त्या सातत्याने रडून मुलाची आठवण काढत होत्या. दरम्यान सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी घरी असलेले फिनाईल प्याटले. त्यातून त्यांची प्रकृती आणखी अस्वस्थ झाली.
त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान लकडगंज पोलिसांनी दोन्ही प्रकरणात प्राथमिक तपासणीत आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
लकडगंजमध्ये बुकींचा उच्छाद
गेल्या काही वर्षांमध्ये लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सट्टा बुकींनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांच्या वरदहस्ताने त्यांच्यावर कुठलीच कारवाई कली जात नाही. विशेष म्हणजे, त्यांच्यावर गुन्हे शाखेचे पथक आणि युनिट पथकांकडून छापे टाकून थातूरमातूर कारवाई केल्याचे दिसून येते. त्यातूनच अनेक युवक क्रिकेट सट्ट्याच्या आहारी गेल्याचे दिसते. विशेष म्हणजे, बुकींकडून युवकांना धमकाविण्यात येते. त्यातूनच खितेशलाही धमकाविण्यात आले होते.
दोनदा आत्महत्येचा प्रयत्न
खितेश याच्या मृत्यूचा जबर धक्का दिव्या यांना बसला. त्या धायमोकलून रडायला लागल्या. माझा मुलगा कुठे गेला. ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणत त्या रडायच्या. यादरम्यान त्यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता,असे कळते. दिव्या यांनी फिनाईल पिऊन आत्महत्या केली की ह्दयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल,असे लकडगंज पोलिसांनी सांगितले.
एकाच दिवशी दोघांवर अंत्यसंस्कार
खितेशने रविवारी आत्महत्या केली. त्यातून त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, सोमवारी (ता.२२) त्याच्या आईनेही आत्महत्या केली. त्यामुळे एकाच दिवशी आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वडिलांसह कुटुंबियांवर आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.