बहुचर्चित मिहानमध्ये चाळीस टक्के उद्योग! टाटा-एअरबस, इंडामेर कंपनीचा एमआरओ मिहानला देणार बळकटी

विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी दोन दशकांपूर्वी नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर’ (मिहान) प्रकल्पाला अपेक्षित प्रगती साधता आली नाही.
40 percent industry in popular mihan mro of tata-airbus indamer company strength
40 percent industry in popular mihan mro of tata-airbus indamer company strength Sakal
Updated on

Nagpur News : विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी दोन दशकांपूर्वी नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर’ (मिहान) प्रकल्पाला अपेक्षित प्रगती साधता आली नाही.

मात्र टाटांचा एअरबस आणि अलीकडेच उद्‍घाटन झालेल्या इंडामेर कंपनीच्या ‘एमआरओ’ (देखभाल दुरुस्ती केंद्र) प्रकल्पामुळे मिहान भरारी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युरोपियन बहुराष्ट्रीय विमाननिर्मितीच्या हेलिकॉप्टरची देखभाल दुरुस्ती इंडामेर कंपनीच्या एमआरओमध्ये केली जाणार आहे. टाटा-एअरबस प्रकल्पाचेही कामही सुरू आहे. त्यामुळे उद्योजकांच्या आशा वाढल्या आहेत.

उद्योगांची पळवापळवी झाली नाही तर मिहानला व पर्यायाने विदर्भाला विकासाचा बूस्टर मिळू शकतो. देशाचे मध्यवर्ती ठिकाण, पायाभूत सुविधा, देशाच्या चारही दिशांना रेल्वेचे जाळे हे मिहानचे वैशिष्ट्य आहे.

हे लक्षात घेऊनच मिहानची निर्मिती केली आहे. मात्र येथे अपेक्षित गुंतवणूक झाली नसल्याची खंत आकडेवारीवरून पुढे येत आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) फक्त ४० टक्केच उद्योग सुरू झाले आहेत. या प्रकल्पातील सेझच्या बाहेर ५० उद्योगांसह इतर उपक्रम सुरू आहेत.

त्यात सात हजार २०० कोटीची गुंतवणूक झाली असून अंदाजे एक लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. सेझमध्ये ९६ कंपन्यांना जागा घेतल्या असताना फक्त ३८ उद्योगांची कामे सुरू आहेत.

मिहानचे मार्केटिंग आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीपासूनच हवे तसे प्रयत्न झालेले नाहीत. तिकडे ‘सुरत डायमंड बोर्स’चे उद्घाटन गुजरातच्या सुरतमध्ये झाले. हा हिरे बाजार ३४०० कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आला. या बाजाराचा विस्तार अमेरिकेतील पेंटागॉन इमारतीपेक्षाही जास्त आहे.

४५०० हिरे कंपन्यांची कार्यालये येथे सुरू झालेली आहेत. या बाजारामुळे सुरतच्या हिरे उद्योगात अजून दीड लाख लोकांना रोजगार मिळेल. याचे बांधकाम फेब्रुवारी २०१५ पासून सुरू झाले व डिसेंबर २०२३ मध्ये उद्घाटन झाले. राजकीय इच्छाशक्तीचे हे उत्तम उदाहरण. मिहानला अशी राजकीय इच्छाशक्ती प्राप्त होऊ शकली नाही.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

प्रकल्पासाठी रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतूक सहज उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळालगत बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र असलेला बहुधा हा एकमेव प्रकल्प आहे. विशेष आर्थिक क्षेत्र आणि या क्षेत्राबाहेरील भाग असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. दोन हजार हेक्टरवर विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि त्याबाहेरील परिसर सुमारे एक हजार हेक्टरचा आहे.

प्रकल्प केव्हा सुरू झाला?

महाराष्ट्र सरकारने चार जानेवारी २००२ ला मिहान प्रकल्पाला मान्यता दिली. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) ही नोडल एजन्सी स्थापन केली. जानेवारी २००८ मध्ये केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली.

प्रकल्पाचा आत्मा कार्गोहब असून त्यासाठी किमान दोन धावपट्ट्या आवश्यक आहेत. त्यासाठी तेल्हारा, कलकुही, दहेगाव, खापरी आणि शिवणगाव येथील चार हजार २०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील एक हजार ३६० हेक्टर विमानतळासाठी आहे

रामदेव बाबांच्या प्रकल्पाला गती

रामदेवबाबांच्या पतंजली प्रकल्पाला कमी दरात जमीन दिल्यामुळे वादात सापडला होता. या प्रकल्पातील फूड अँड हर्बल पार्क येथे संत्रा तसेच विविध फळांपासून रसनिर्मिती येत्या एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे.

एका दिवसांत ४०० टन संत्रा आणि मोसंबीचा क्रश करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. हंगामात ३६ हजार टन फळांवर प्रक्रिया केली जाईल. यात तयार होणारा लगदाही विकला जाईल. यात आतापर्यंत ५५० कोटींची गुंतवणूक केली आहे. येथील पीठ गिरणी सुरु झाली असून त्याचा वापर बिस्कीट उत्पादनासाठी करण्यात येत आहे.

धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क

मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क विकसित होत आहे. आतापर्यंत येथे केवळ चार कंपन्या कार्यरत आहेत. निर्यातीने १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. राफेलचे काही सुटे भाग बनवले जात आहेत. एका प्रसिध्द अशा रडार कंपनीचे काम सुरु झाले आहे. फाल्कनचे बहुतांश काम येथे केले जात आहे. पुढील वर्षापर्यंत येथे संपूर्ण विमाने तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ऑरेंज सिटी गोल्ड क्लस्टर

मिहानमध्ये स्थानिक ज्वेलर्सकडून ‘ऑरेंज सिटी गोल्ड क्लस्टर’ उभारण्याचा संकल्प केला असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) सहा महिन्यांपूर्वी तसा प्रस्तावही दिला आहे. परंतु, त्याला मूर्त रुप आलेले नाही. यात अंदाजे ५० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यात दागिने घडवणूक, प्रशिक्षण आणि गोल्ड रिफायनरी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन हजार लोकांना रोजगार मिळून नागपूरला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

विशेष आर्थिक क्षेत्रातील जागा वाटप

  • कंपन्या -९६

  • कार्यान्वित -३६

  • कंपन्या सुरू - ५०

  • एकूण रोजगार - १ लाख

मिहानमध्ये येत्या काळात मेडिकल आणि फार्मा क्षेत्रातील काही कंपन्यांची गुंतवणूक होणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांडपाण्याच्या प्रश्नांसह इतरही विषय मार्गी लागणार आहे. पतंजली फूडपार्कमध्ये एप्रिल महिन्यापासून उत्पादन सुरू होईल. गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे (गेल) कार्यालयही सुरू होणार आहे.

- स्वाती पांडे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास मंडळ

मिहान प्रकल्पातील केवळ ३८ उद्योग सुरू असून त्यातील दहा युनिट फक्त मोठे आहेत. शेकडो एकर जमीन खाली पडलेली आहे. राजकीय इच्छाशक्ती असली तरी त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करून गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी एमएडीसीचे मुख्य कार्यालय नागपुरात आणावे. एमएडीसीच्या पदाकडे साइड पोस्ट म्हणून पाहिले जाऊ नये.

- डॉ. दीपेन अग्रवाल, सदस्य, बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी (एमएडीसी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.