Nagpur News : शहरातील उद्याने स्वच्छ ठेवणारा अवलिया !

८० वर्षीय बलदेव चावला उचलतात बगिचामधील कचरा
80-year-old Baldev Chawla keeps parks clean nagpur
80-year-old Baldev Chawla keeps parks clean nagpursakal
Updated on

नागपूर : आयुष्यभर कष्ट उपसल्यानंतर अनेक जण म्हातारपणात सहसा आराम करणे पसंत करतात. किंवा मुले, सुना व नातवंडांसोबत वेळ घालवितात. मात्र उपराजधानीत एक असा अवलिया व्यक्ती आहे, ज्याने घरी स्वस्थ न बसता समाजसेवेचा वसा घेतला आहे. हा माणूस विविध उद्यानांमधील कचरा स्वयंस्फूर्तीने उचलून उद्यानांसह शहरालाही स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

नागपूरकरांसाठी एकप्रकारे स्वच्छतादूत ठरलेले हे व्यक्ती आहेत बलदेव चावला. रामदासपेठमधील पवनसुत अपार्टमेंटमध्ये राहणारे व व्यावसायिक कुटुंबातील ८० वर्षीय बलदेव प्रत्येक रविवारी लेंड्रा पार्क, दगडी पार्क तसेच जरीपटका येथील दयानंद पार्कमध्ये सेवा देऊन तेथील कचरा पिशवीत गोळा करतात आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट लावतात.

गेल्या चार वर्षांपासून अव्याहतपणे त्यांची ही समाजसेवा सुरू आहे. अगदी कोरोना काळातही त्यांनी स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले. ''एकला चलो रे'' प्रमाणे ते एकटेच केरकचरा व प्लास्टिक्स उचलत असतात. यामुळे त्यांचा तर टाइमपास होतोच, शिवाय उद्याने स्वच्छ ठेवण्यातही हातभार लागतो.

बलदेव यांना पत्नी व तीन मुले आहेत. एक मुलगी भिलाई येथे, तर दुसरी मुलगी व मुलगा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. नातवंडांची आठवण आली की दोन-तीन वर्षांतून एकदा अमेरिकेला जाऊन येतात. मात्र तेथे मन रमत नसल्याने नागपुरातच राहणे आवडते, असे ते म्हणाले.

बलदेव म्हणतात, सध्या घरी आम्ही दोघेच पती-पत्नी आहोत. घरात करमत नव्हते. त्यामुळे टाइमपास करण्यासाठी कचरा उचलण्याचे काम सुरू केले. हातून थोडीफार समाजसेवा घडावी आणि नागपूर शहर सुंदर व्हावे, हाही यामागचा उद्देश होता. धार्मिक वृत्तीचे बलदेव दर महिन्याला तब्बल नऊ तास २० किमी पायी कोराडीवारी करतात.

शिवाय फिटनेससाठी दररोज सकाळी चार-पाच तास वॉक करतात. नियमित व्यायामामुळे ८० व्या वर्षीही ते धडधाकट व तंदुरुस्त आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांना एकही आजार नाही. कधी डॉक्टरकडेसुद्धा गेले नाहीत. शुद्ध शाकाहारी आहेत. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पीत नाहीत; मद्यपानही करीत नाहीत. आयुष्यात कधीही दारूला शिवले नाही. मात्र उद्यानांमध्ये साफसफाईच्या निमित्ताने दारूच्या बाटल्या उचलाव्या लागतात, असे ते मिश्‍किलपणे म्हणाले.

उपक्रमात सहभागी होण्याचे तरुणांना आवाहन

बलदेव यांच्या मते, नागपूरकर स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात गंभीर नाहीत. त्यामुळेच शहरातील बहुतांश उद्यानांमध्ये कचरा साचतो. लोक विशेषतः तरुण मंडळी उद्यानांमध्ये खातात आणि कचरा तिथेच टाकून देतात. त्यांनी या घाणेरड्या सवयीला लगाम घातल्यास माझ्यासारख्या माणसाला हे काम करण्याची गरज पडणार नाही, असे सांगून स्वच्छतेच्या मिशनमध्ये ज्येष्ठ सहकाऱ्यांना जुळण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.