नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे नव्या वर्षात शुल्कवाढीचा फटका देण्यात येणार आहे. बुधवारी (ता.६) व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पुढल्या वर्षीपासून दरवर्षी सात टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी संघटना विरुद्ध विद्यापीठ असे चित्र दिसून येणार आहे.
विद्यापीठाने २०१६ पासून प्रवेश आणि परीक्षा शुल्कात कुठलीही शुल्कवाढ केली नसल्याचा दाखला देत, व्यवस्थापन परिषद सदस्य अजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यात नीळकंठ लांजे, देवेंद्र भोंगाडे, अजय चव्हाण, तुर्के यांचा समावेश आहे. मात्र, शुल्क वाढीला अनेकांचा विरोध होता.
त्यामुळे विद्यापीठाने शुल्क वाढ करण्याआधी प्राचार्य, संस्था व्यवस्थापन, विद्यार्थी संघटनांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी विद्यार्थी संघटनांनी शुल्क वाढीला विरोध केला होता. त्यामुळे शुल्क वाढ होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, त्यानंतरही विद्यापीठाने बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढ केल्याचा निर्णय घेतल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वामन तुर्के यांनी दिली. तसेच शुल्क वाढीला सदस्य अजय चव्हाण आणि तुर्के यांनी विरोधही दर्शवला.
विद्यार्थी आणि पालकांवर शुल्कवाढीचा बोजा देणारा निर्णय गुपचूप घेत, त्यातून संस्थांना फायदा करून देण्याचे काम कुलगुरूंमार्फत होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे. त्यातून आता पुन्हा एकदा विद्यार्थी संघटना त्याविरोधात एकत्र येत विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध करण्याची शक्यता आहे.
होतकरू विद्यार्थ्यांना फटका
गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. त्यात कोरोनाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. अनेकांचे रोजगार आणि काहींच्या कुटुंबियांचा आधार गेल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांवर मधूनच शिक्षण बंद करण्याची वेळ आली. शहरात काही वेगळी परिस्थिती असली तरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात शिक्षण घेणे ही बाब कठीण झाली असल्याचे चित्र असताना, आता विद्यापीठाद्वारे नव्या सत्रात शुल्कवाढीचा निर्णय घेतला.
सुविधा नाही शुल्कवाढ नाही
विद्यापीठाच्या अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे अशावेळी विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयांना अधिकचे शुल्क का द्यायचे, असा प्रश्न सदस्य वामन तुर्के आणि प्रा. अजय चव्हाण यांनी उचलून धरला. याशिवाय त्याविरोधात मत दिले.
९०० कोटींची गंगाजळी
विद्यापीठाकडे सध्या ९०० कोटींची गंगाजळी आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम दरवर्षी वाढत असताना, शुल्कवाढ कशाला?याबाबत प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे फेरमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून साडेचारशे प्रत्येक पेपरचे घेण्यात येतात. त्यातूच विद्यापीठाला कोट्यवधींची कमाई होताना दिसून येते. मात्र, त्या बदल्यात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधाही मिळत नसल्याचे दिसून येते.
प्रवेश, परीक्षा आणि परिणाम हा आमचा नारा आहे. विद्यापीठाने आधी या तीन्ही प्रणालीत सुविधा करावी त्यानंतरच शुल्क वाढीचा विचार करावा. शुल्क वाढ करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत होत नसतील, निकाल वेळेत लागत नसतील तर अशा वाढीला अर्थ नाही. त्यामुळे आम्ही शुल्क वाढीला विरोध केला आहे.
- वामन तुर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य
आम्ही नेहमीच शुल्कवाढीच्या विरोधात आहोत. याबाबत अनेकदा आम्ही विरोध केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महाविद्यालयांकडून सुविधा मिळत नाही. मग विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क का द्यायचे.
-प्रा. अजय चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.