नागपूर - महागडी बी-बियाणे व खते, आवाक्याबाहेरची शेतमजुरी, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने अलीकडच्या काळात शेती परवडेनासी झाली आहे. परिणामतः नागपूर-जलालखेडा महामार्गावरील अनेक शेतकऱ्यांनी ‘शेती विकणे आहे’, असे फलक लावून एकप्रकारे व्यवस्थेवरच आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कृषिप्रधान गणल्या जाणाऱ्या भारत देशात एकेकाळी ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ असे म्हटले जायचे. मात्र काळाच्या ओघात ही म्हण बदलली आहे. आता शेती कनिष्ठ अर्थात कमी दर्जाची समजली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे.
वर्षभर उन्हातान्हात ढोरमेहनत करूनही ‘पळसाला पाने तीनच’ अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. ‘सौ के साठ करना और बाप का नाम चलाना’ अशी सध्या शेतीची अवस्था झाली आहे.
शेती विकणे आहे हो!
त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांनी हात टेकले आहे. मायबापांचे होत असलेले हाल बघता, युवापिढीही शेती व्यवसायाबद्दल उदासीन दिसून येत आहे.
यामागच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला असता, यासाठी अनेक अडचणी व समस्या जबाबदार असल्याचे दुःखद चित्र पाहावयास मिळते. मुळात आजच्या महागाईच्या काळात शेती करणेच परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आज एकीकडे बी-बियाणे व खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचवेळी शेतमजुरीही भरमसाठ वाढली आहे.
बैलबंडी, गडी माणसे व कृषी साहित्य (अवजारे) सुद्धा दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, हीदेखील कारणे आहेत. शेती मुख्यत्वे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असतो. याच कारणांमुळे शेतकऱ्यांनी शेती विकायला काढली आहे.
मेहनतीचे फळ मिळत नसल्याने नाउमेद
यासंदर्भात बोलताना काटोलचे युवा शेतकरी आशिष चौधरी म्हणाले, माझ्याकडे ओलिताची दहा एकर शेती आहे. यात संत्रा, कापूस, सोयाबीनसह अन्य पिके घेत असतो. मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळत नसल्याचे नाउमेद झालो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत सातत्याने हे घडत आहे.
त्यामुळे आता शेती विकून ते पैसे बँकेत फिक्समध्ये (एफडी) टाकून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशात उर्वरित आयुष्य तणावमुक्त, सुखा-समाधानाने व आनंदात जगण्याचा मी निर्णय घेतला आहे. याच परिसरातील आणखी एक शेतकरी देवेंद्र राऊत यांनीही शेती परवडत नसल्याने शेतात प्लॉट पाडून विकायला सुरवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.