Alandi Dindi : विठुरायाच्या ओढीने माऊली आळंदीच्या वाटे;वारकऱ्यांच्या संख्येमध्ये यंदा शंभराने वाढ

यंदा, शहरातून एका दिंडीची भर पडली असून श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज हरिपाठ मंडळातील शंभर वारकऱ्यांचा सहभाग आहे.
Alandi Dindi
Alandi Dindi sakal
Updated on

नागपूर, ता. २५ : पिकवावे धन । ज्याची आस करी जन ।

पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ।।

खोली पडे ओली बीज ।

तरीच हाता लागे निज ।

तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरे या तिन्ही ।।

या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलनामाच्या कधीही न संपणाऱ्या अमूल्य ठेव्याची महती सांगितली आहे. ही महती उरी बाळगून अन्‌ ओढ मनी धरून श्री विठ्ठल भेटीस आतुर झालेल्या वैष्णवांची मांदियाळी नागपूर येथून पंढरपूरकरिता मार्गस्थ झाली. दरवर्षी विविध दिंडी स्वरूपात नागपूर जिल्ह्यातील ५० हजारांच्यावर वारकरी या उत्सवात सहभागी होत माऊलीच्या गजरात तल्लीन होतात. यंदा, शहरातून एका दिंडीची भर पडली असून श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज हरिपाठ मंडळातील शंभर वारकऱ्यांचा सहभाग आहे.

परंपरेनुसार टाळ-मृदंगाचा निनाद.. दिंड्या, भगव्या पताकांचा भार.. डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी विठुनामाचा गजर करीत निघालेल्या वारकऱ्यांनी नागपूरकर नगरीत चैतन्यमयी वातावरण तयार झाले. हुडकेश्‍वर रोडवरील पीपळा फाटा येथून विठुरायाच्या ओढीने माऊली आळंदीच्या वाटे

सोमवारी ही दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आळंदी येथून शनिवारी (ता. २९) पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामध्ये, हे वारकरी पायदळ सहभागी होतील. तर, प्रेमनगर येथून निघणारी गोविंद महाराज कन्हेरकर वारकरी दिंडी ही नागपूर येथून थेट पंढरपूरकडे निघणारी एकमेव दिंडी आहे. या दिंडीत नागपूर ते पंढरपूर तब्बल दीडशे वारकरी चालतात.

गोविंद महाराज कन्हेरकर वारकरी दिंडीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविक पंढरपूरसाठी रवाना झाले. यवतमाळ, हिंगोली मार्गे ही दिंडी पंढरपूर गाठणार आहे. या दिंडीच्या प्रस्थानापूर्वी वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले. वारीमध्ये सहभागी होऊ न शकणाऱ्या वारकरी संप्रदायातील अनेक भक्तगण या वारकऱ्यांसमोर नतमस्तक झाल्याचे सुखद दृश्‍य दिसले. या दिंडीमध्ये जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातील भक्त मंडळींचा समावेश आहे. समस्त वैष्णवजनांना सावळ्या विठूरायाच्या भेटीची लागलेल्या आसेने आपसूकच पंढरपूरनगरीकडे खेचून घेतले. इतर दिंड्या २४ ते २७ जूनच्या दरम्यान रेल्वे, बसमार्गे आळंदी येथून ज्ञानेश्‍वर माऊलीच्या पालखीत सहभागी होतील. याशिवाय, थेट पंढरपूर गाठणाऱ्या जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

पंढरपूर, आळंदीकडे मार्गस्थ दिंड्या

  • गोविंद महाराज कन्हेरकर वारकरी दिंडी

  • (नागपूर ते पंढरपूर पायदळ प्रवास - १५० वारकरी)

  • अशोक महाराज देवतळे, अयोध्यानगर नाग मंदिर

  • (आळंदी ते पंढरपूर - २५० वारकरी)

  • बोरकर व लांजेवार महाराज, लाडीकर ले-आउट हनुमान मंदिर (आळंदी ते पंढरपूर - ३०० वारकरी)

  • वासुदेव महाराज टापरे, काटोल

  • (आळंदी ते पंढरपूर - ४०० वारकरी)

  • परसराम कळंबे महाराज, तोळापार, ता. नरखेड (आळंदी ते पंढरपूर - ४०० वारकरी)

  • श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज हरिपाठ मंडळ, पीपळा फाटा (आळंदी ते पंढरपूर - १०० वारकरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.