नागपूर : पती-पत्नीचा एकमेकावर विश्वास असणे ही यशस्वी सहजीनाची गुरूकिल्ली आहे. संशयामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे उदाहरण आपल्या समाजात आहेत. असाच एक संसार संशयामुळे उद्ध्वस्त झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास हिवरीनगरात उघडकीस आली.
श्रृती भुजाडे (वय 28) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून आरोपी पती विलास भुजाडे (वय 36, रा. हिवरीनगर) ला पोलिसांनी अटक केली. विलास हा किराणा दुकानदार असून घरासमोर त्याचे मोठे किराणा दुकान आहे. त्याचे कळमेश्वरमधील श्रृतीशी गेल्या सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी असून ती पहिल्या वर्गात शिकते. विलास हा संशयी स्वभावाचा आहे. त्यामुळे तो सुरुवातीपासूनच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.
गेल्या काही दिवसांपासून विलास हा किराणा दुकानात आलेल्या युवकांसोबत बोलल्याच्या कारणावरून श्रृतीशी वाद घालत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणही करीत होता. विलास हा पत्नी श्रृती आणि मुलीसह घराच्या वरच्या माळ्यावर राहत होता तर आईवडील खाली राहत होते. घराशेजारीच त्याचा लहान भाऊ राहतो. सोमवारी सायंकाळी श्रृती मोबाईलवर बराच वेळ बोलत होती, त्यामुळे त्याने संशय घेऊन तिच्याशी वाद घातला. पत्नीने ही वारंवार संशय घेत असल्यामुळे "जशाच तसे' उत्तर दिले.
त्यामुळे विलासला अपमान झाल्यासारखे वाटले. रात्री दोघांनीही मुलीसह जेवण घेतले आणि झोपी गेले. मात्र, विलासच्या डोक्यात पत्नीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खदखद होत होती.
श्रृती ही मुलीसह झोपली होती. रात्री दोन वाजता विलास झोपेतून उठला. किचनमधून त्याने चाकू आणला. श्रृतीच्या गळ्यावर सपासप वार करीत जागीच ठार केले. आईच्या किंचाळण्यामुळे मुलगी झोपेतून उठली. वडिलाचा रूद्रावतार आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ती घाबरली. तिने आरडाओरड केल्यामुळे खाली झोपलेले आजी-आजोबांनी लगेच धाव घेतली.
सतत मोबाईलवर बोलणे नडले
श्रृती नेहमी मोबाईलवर बोलत असे. अनेकदा विलासने तिची समजूत काढून मोबाईलवर बोलण्यापासून रोखले. मात्र, मैत्रिणीसोबत बोलत असल्याचे सांगून ती तासनतास मोबाईलवर बोलत होती. त्यामुळे विलास तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ती कुण्यातरी युवकाच्या प्रेमात पडली असून त्याच्याशी मोबाईलवरून बोलत असल्याचा संशय विलासला आला होता.
विलासने अत्यंत निर्दयीपणे श्रृतीचा गळा चिरला. त्यानंतर तो शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसला. त्याला कोण्यात्याही प्रकारचा पश्चाताप नव्हता. नंदनवनचे ठाणेदार संदीपान पवार यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यावेळी तो तेथेच बसून होता तर त्याने चाकूही हातातच ठेवला होता. पोलिस येताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.
श्रृती ही गेल्या काही दिवसांपासून कुणाशीतरी रात्री उशिरापर्यंत वॉट्सऍपवर चॅटिंग करीत होती. मध्यरात्रीच्या सुमारास तिला चॅटिंग करताना बघून विलासचा पारा चढला होता. मोबाईल चॅट दाखविण्यासाठी मोबाईल मागितला असता तिने चक्का नकार दिला होता. तसेच पासवर्ड सांगण्यासही नकार देत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.