नागपूर : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या मनात आता आपले आयुष्य संपलेच, अशी भीती निर्माण व्हायची. शेल्टर होममधील अनेकांनी जगण्याची आशाच सोडून दिली होती. आपण इथेच मरू, या भीतीने कित्येकांना जेवणच जात नव्हते. रात्रीची झोप गेलेली होती. अशा नागरिकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम अर्शद तन्वीर खान यांनी केले. घरादारापासून पारखे झालेल्यांना मायेची सावली त्यांनी दिली. स्थलांतरित नागरिकांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या खर्चातून मूलभूत सुविधा पुरविल्या. लहान मुलांसाठी दूध, डॉक्टरपासून महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्याचे काम अर्शद यांनी केले.
रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे धडकी भरायची. ज्यांच्या दोनवेळच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नव्हता, ते कुटुंबीयांसह घरात होते. परंतु, ज्यांचे पोटच रोजच्या कमाईवर आहे त्यांचे काय? हाताला काम नसल्याने हैदराबादहून पती-पत्नी तान्हुलीसह उत्तर प्रदेशातील गावाकडे पायीच निघाले.
नागपुरात त्यांना थांबविण्यात आले आणि त्यांची रवानगी मनपाच्या शेल्टर होममध्ये झाली. मातेच्या छातीशी बिलगलेली चिमुकली दुधासाठी कासावीस झालेली. परंतु, दोन दिवसांपासून उपाशी आईला पान्हा येणार तरी कुठून? शेल्टर होममध्ये जेवणाची व्यवस्था तर होती. परंतु, लहान मुलांचे खानपान, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न होतेच.
ही बाब अर्शद तन्वीर खान यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पत्नीला त्या महिलेची विचारपूस करण्यास सांगितले आणि बाळासाठी दुधाच्या डब्याची व्यवस्था केली. मुलीसाठी आणलेला दुधाचा डबा पाहताच मातेचा कंठ दाटून आला. ‘तुमच्या या दुधाचे उपकार आम्ही कदापि विसरू शकणार नाही. आपका साडेचार सौ का दूध का डिब्बा मेरी बच्ची को जीवन देगा’, असा कृतज्ञ भाव तिने व्यक्त केला.
मनपाने उभारलेल्या शेल्टर होममधील नागरिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट संस्थेला नियुक्त केले होते. या संस्थेचे अध्यक्ष अर्शद तन्वीर खान आणि त्यांची टीम नागरिकांचे समुपदेशन करून छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण द्यायचे. याच शेल्टर होमच्या बाहेर एका वृद्धाचे वास्तव्य होते. दिवसभर रस्त्यावरील रद्दी जमा करायची आणि सायंकाळी ती विकून उदरभरण करायचे, हा त्याचा नित्यक्रम.
विक्री न झालेल्या रद्दीवर झोपून रात्र काढायची आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा तोच दिनक्रम. हा वृद्धही शेल्टर होममध्ये यायचा. ही बाब अर्शद यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या वृद्धाचे समुपदेशन केले. ‘तुम्ही जे जगता ते आयुष्य नव्हेच’, हे त्याला पटवून दिले. अखेर त्या व्यक्तीने बदलण्याचा निर्णय घेतला. आज ते राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कामावर आहेत. असे एक-दोन नव्हे, तर कितीतरी प्रसंग अर्शद तन्वीर खान यांनी सांगितले.
शेल्टर होममध्ये प्रत्येकाकडे वेळच वेळ होता. त्यामुळे नुसते समुपदेशनापुरते मर्यादित न राहता नागरिकांना कमीत कमी वेळात प्रशिक्षण देऊन तिथल्या तिथे रोजगार मिळवून देण्याचे काम इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यासाठी स्वतः तन्वीर खान यांनी पुढाकार घेतला. आपल्या परिचयातील व्यक्तींकडून रद्दी पेपर जमा करून त्याचे लिफाफे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कोरोनामुळे जगणेच हिरावून घेतलेल्या नागरिकांचा खरा आधार झाले ते अर्शद तन्वीर खान आणि त्यांची टीम. शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या नागरिकांच्या खाण्याची, राहण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु, मुलाबाळांसह रस्त्यावर आलेल्या नागरिकांना मायेची ऊब देण्याचे काम अर्शद यांनी केले. ज्यावेळी नागरिकांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती, तेव्हा दिवसरात्र एक करून कोरोनाचे भय न बाळगता खान यांनी माणुसकीचा परिचय दिला.
कोरोनातून बोध घेऊन पुढे वाटचाल करणे गरजेचे
आता दिवसेंदिवस कोरोनाची धास्ती कमी होत आहे. आजारांवर मात करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने भय कमी होत आहे. परंतु, मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकात प्रचंड धास्ती होती. समुपदेशकाची भूमिका निभावताना शेल्टर होममध्ये मी समुपदेशन केलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आल्याने धक्काच बसला. कारण, या एका दिवसात मी शेकडो लोकांच्या संपर्कात आलो होतो. माझी कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल येतपर्यंत मला झोपच आली नाही. कुटुंबीयांची अवस्था याहून वेगळी नव्हती. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनाने प्रत्येकालाच खूप मोठा धडा शिकवला. यातून बोध घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे.
- अर्शद तन्वीर खान,
अध्यक्ष, इंटरनॅशनल स्कूल डेव्हलपमेंट सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.