सावनेर : पंढरपूर येथील आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी सावनेर येथील शंभरपेक्षा जास्त विठ्ठल भक्तांच्या वारीने आळंदी ते पंढरपूरच्या पायी वारीसाठी प्रस्थान केले आहे. याप्रसंगी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक विठुराच्या दर्शनासाठी जातात. सावनेर येथील भक्त सुद्धा दर्शनासाठी आसुसले असतात. येथील भक्तांनी पंढरपूर जाण्यासाठी पायी वारी काढली.
गुरुवारी येथील होळी चौकातील त्र्यंबकेश्वर महादेव नागद्वार स्वामी मंदिरात वारीला जाणारे सर्व भाविक एकत्रित आले. येथील मंदिरात अशोकराव उमाटे, हभप गावंडे महाराज, संजय जवाहर, तुषार उमाटे, व विठ्ठल भक्तांनी पूजन केले. यानंतर पंढरपूरला प्रस्थान करण्यासाठी दिंडी पताका घेऊन पायी वारीला सुरुवात झाली. यावेळी मंदिर समिती, प्रगती दुर्गा उत्सव मंडळासह शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगवा झेंडा हा भक्तीचा व समतेचा संदेश देत होता.
तर वारीच्या भ्रमण मार्गात पांडुरंगाचा जयघोष होत असल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगा चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी संप्रदायात आषाढी एकादशी व कार्तिक एकादशीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर राज्यातील लाखो पांडुरंग भक्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जातात. विठ्ठल भक्तांच्या मनात ओढ असते, ती विठुरायाच्या दर्शनाची.
पांडुरंग नाव घेतले तर आम्हाला जगण्यास बळ मिळते, असे वारकरी सांगतात. आषाढी एकादशी निमित्ताने मागील तीन वर्षापासून सावनेरातील अशोकराव उमाटे महाजन व हभप गावंडे महाराज यांच्या पुढाकारात पंढरपूरकरिता पायी वारीचे आयोजन केले जात आहे. यात वारकरी व इतर विठ्ठल भक्त असे जवळपास १०० पेक्षा जास्त भाविक सहभागी होतात.
विठुरायाचा गजर
त्र्यंबकेश्वर महादेव नागद्वार स्वामी मंदिरातून निघालेल्या वारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विठुरायाच्या गजर सर्वत्र होता. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल नामाने परिसर दुमदुमून गेला. अनेकांनी पांडुरंगाजवळ आमच्यासाठी आशीर्वाद मागा, असे आवर्जून सांगितले. सावनेरातील वातावरण भक्तीमय झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.