नागपूर : काटोलचे माजी आमदार आणि काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अनेकांना बुचकळ्यात टाकले. या भेटीगाठीमुळे ते पुन्हा काटोल विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे त्यांना भाजप सावनेरमध्ये पाठवणार असल्याचा तर्क लावला जात आहे.
भाजपला काटोल विधानसभा मतदारसंघ कधीच जिंकता येत नव्हता. येथून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करणे अवघड आहे असेच सर्वांना वाटत होते. भाजप-सेना युतीच्या काळात देशमुखांना पराभूत करण्याचे सर्व प्रयोग फसले होते. त्यामुळे भाजप या मतदारसंघात फारसे गांभीर्याने लक्ष घातले नव्हते.
आशिष देशमुख हे काका अनिल देशमुख यांच्या विरोधात लढणार नाही असेच सर्वांना वाटत होते. कोणी तगडा उमेदवार नसल्याने भाजपने आशिष देशमुख यांना काटोलमध्ये धाडले. त्यानंतर आशिष देशमुख यांनी इतिहास घडवला. त्यांना काका अनिल देशमुख यांना त्यांनी पराभूत करून भाजपचे कमळ फुलवले. मात्र भाजपच्या नेत्यांसोबत त्यांचे फारसे पटले नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्दा घेऊन त्यांनी भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणले. शेवटी स्वतःच आमदारीकाचा राजीनामा देऊन भाजपातून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये दाखल झाले.
काँग्रेसने त्यांना अवघड जागा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पाठवले. कोणी दिमतीला नसताना देशमुखांनी तगडी लढत देऊन फडणवीसांचे एका लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचे मनसुबे उधळून लावले. देशमुख काँग्रेसमध्येही शांत बसले नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली. पटोले यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. पटोले यांना राज्यातील शिंदे सेना-भाजपकडून महिन्याला खोका पाठवला जातो असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
या दरम्यान राहूल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्यावतीने देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित केले आहे. ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा असताना सोमवारी अचानक भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांनी अनेकांना धक्का दिला.
भाजपकडे काटोल आणि सावनेर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजयाची क्षमता असलेला चेहरा नाही. सावनेरमधून सुनील केदार यांना पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न भाजपचे यापूर्वी फसले आहे. अमित शहा यांना भाजपने सावनेरमध्ये प्रचारासाठी आणले होते. मात्र केदार यांना पराभूत करता आले नाही, उलट त्यांचे मताधिक्य वाढले ही वस्तुस्थिती आहे. दहा वर्षांपूर्वी आशिष देशमुख यांनी केदारांना कडवी लढत दिली होती. हा इतिहास बघता भाजप पुन्हा देशमुखांवर सावनेरमधील डाव लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा नियोजन समितीच्या कामासाठी आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. ही भेट राजकीय नव्हती. मी काँग्रेस पक्ष सोडला नाही आणि काँग्रेसनेही मला पक्षातून काढले नाही. फक्त निलंबित केले आहे. यापूर्वी सतीश चतुर्वेदी यांनाही पक्षाने निलंबित केले होते. निलंबन म्हणजे हकालपट्टी होत नाही. पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला मी सविस्तर व समर्पक उत्तर दिले आहे. त्यामुळे माझे निलंबन मागे घेतले जाईल अशी आशा आहे. विधानसभेची निवडणूक कुठून लढायची हा प्रश्न निवडणुका जवळ आल्यावर घेऊ.
-आशिष देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.