काय आहे हा प्रकार, डांबरीकरणाचे रस्ते चक्क मातीने बुजविले !

मौदाः रस्यावर जेबीसीने टाकण्यात आलेली माती.
मौदाः रस्यावर जेबीसीने टाकण्यात आलेली माती.
Updated on

मौदा (जि.नागपूर): मौदा-रामटेक मुख्य रस्त्याच्या दुर्गतीबद्दल गावकऱ्यांनी निवेदने दिले. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क डांबरीकरणाच्या रोडवर माती टाकली. ही माती पाण्याने वाहून गेली आणि पुन्हा खड्डे उघडे पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला हा प्रताप पाहता रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची व उखडलेल्या रस्त्याची अतिशीघ्र दुरुस्ती करण्याबाबत मंगळवारी उपविभागीय अधिकारी शाम मदनुरकर व तहसीलदार प्रशांत सांगडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गावकऱ्यांनी निवेदन दिले. ‘चक्काजाम’ आंदोलनाची परवानगी मागितली. त्याअनुषंगाने आज बुधवारी तारसा जॉइन्ट येथे मुख्य रस्त्यावर आंदोलन केले.

खड्डा चुकवून पुढे जायचे कसे?
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून या रस्त्याच्या दुरवस्थाकडे दुर्लक्ष करत आहेत. ही बाब प्रशासकीयदृष्ट्य़ा अत्यंत चिंताजनक आहे.  मौद्यापासून ते नंदापुरी गावापर्यंत जवळपास २० किलोमीटरपर्यंत या रस्त्याला सध्या जागोजागी खड्डे पडल्यामुळे मोठी दुरवस्था झाली. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, अशी अवस्था झाली आहे. मौद्याकडे जाण्यास हाच मुख्य मार्ग असल्यामुळे ग्रामीण भागातून मौदा येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाकडे येण्यासही हाच मार्ग आहे. याच रस्त्यावर नेरला गावासमोर एका ठिकाणी पाइपलाइनसाठी रस्ता फोडण्यात आल्याने या ठिकाणी मोठे खड्डे तयार झालेले आहेत. या रस्त्याच्या परिसरातील रुग्णांना मौद्याला आणायचे असल्यास खराब रस्त्यामुळे मोठा त्रास होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर या रस्त्याला खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवून पुढे जायचे, हा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.

अधिक वाचाः खबरदार ! येथे मृतदेह जाळता येणार नाही, कारण सांगितले असे...

‘चक्काजाम’ आंदोलन यशस्वी
सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा येथील उपविभागीय अभियंत्याने मागील आठवड्यात माती टाकून हे खड्डे बुजवलेले होते. परंतू ही माती जास्त काळ टिकणारी नव्हती. त्यामुळे रोजच्या ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हे खड्डे पुन्हा उखडून ‘जैसे थे’ झाले. याबाबत नागरिकांकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना पत्रे देऊनही अजूनपर्यंत डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवलेले नव्हते. विशेष म्हणजे मौदा-रामटेक या मुख्य डांबरीकरण मार्गावरील खड्डे मातीने बुजवणे, ही बाब प्रशासकीयदृष्ट्य़ा योग्य नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मौदा येथील अभियंत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम व खंडाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच संकेत झाडे यांनी आज तारसा जॉइंट येथे ‘चक्काजाम’ आंदोलन केले. चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी तारसाचे सरपंच आनंद लेंडे व नावेगावचे सरपंच महेंद्र तांडेकर, चाचेरचे सरपंच महेश कलारे व निसतखेड्याचे सरपंच रजत महादूले यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली.

आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य
अखेर मौदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता संतोष खोब्रागडे आणि नायब तहसीलदार नांदेश्वर यांनी या ‘चक्काजाम’ आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनाला भेट दिली व आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करून आजपासूनच रस्तादुरुस्तीचे काम सुरू करत असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सर्व उपस्थित आंदोलकांनी आंदोलन समाप्त करत असल्याचे जाहीर केले. आंदोलनात रोशन मेश्राम व संकेत झाडे यांच्यासोबत महेश कलारे, महेंद्र तांडेकर, रजत महादूले, मनोज कडू, शेषराव देशमुख, आशीष मेहर, अज्जूभाई पठाण, मनोहर भिवगडे, सौरभ चोपकर, चांगदेव येळणे, अशोक पाटील, किशोर दुपारे, महेंद्र वैरागडे, आकाश नेवारे, राजेश गेडाम व शेकडो नागरिक उपस्थित होते.

एक महिन्याच्या आत दुरूस्ती होईल !
आजपासून रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली असून एक महिन्याच्या आत मौदा-रामटेक रस्ता मेटल आणि डांबरीकरणाद्वारे उत्कृष्टरित्या दुरुस्ती करून दिले जाईल.
-संतोष खोब्रागडे
उपविभागीय अभियंता सा.बा.वि. मौदा

अन्यथा आंदोलन करू !
 एक महिन्याच्या आत जर हा मुख्यरस्ता दुरुस्त झाला नाही तर नंतर अतिशय उग्र आंदोलन करण्यात येईल.
-रोशन मेश्राम, सदस्य ग्रामपंचायत नेरला

मागण्या मान्य केल्याबद्दल आभार
प्रशासनाने वेळेतच रास्तारोको आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला सकारात्मक सहकार्य आमच्या मागण्या मान्य केल्या. त्याबद्दल प्रशासनाचे आभार.
-संकेत झाडे, उपसरपंच खंडाळा

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.