नागपूर - मान्सूनपूर्व वादळामुळे आसाममधील चहाच्या उत्पादनात १५ टक्क्यांची घट झाल्यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व अवकाळी पावसाबरोबरच निर्यातीवर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे चांगली गुणवत्ता असलेल्या चहाच्या किमती वाढलेल्या आहेत. मात्र, सामान्य (सुमार) दर्जाच्या चहाच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. परिणामी, कडक चहा पिण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
चहाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात श्रीलंकेची बिकट अवस्था झालीय. याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भारतीय व्यापारी करताना दिसताहेत. त्यात निर्यात वाढावी म्हणून भारतीय चहा संघटनाही प्रयत्न करताना दिसते. मात्र भारताच्या चहामध्ये मर्यादेच्या पलीकडे कीटकनाशक आणि रसायने सापडत असल्याने जागतिक बाजारातून भारतीय चहा नाकारला जात असल्याने व्यापारामध्ये घसरण होत आहे. अनेक देश चहा आयात करताना कठोर नियमांची अंमलबजावणी करतात. हे नियम युरोपियन संघाने घालून दिलेत आणि ते एफएसएसएआय नियमांपेक्षा ही कठोर आहेत.
कोणतीही कंपनी बाजारातून कीटकनाशक आणून चहामध्ये मिसळत नाही. त्यात त्यांचा काही फायदाही नसतो. ही कीटकनाशके पिकांवर फवारलेली असतात. हवामान बदलामुळे चहाच्या पानांवर किडींचा हल्ला वाढलाय. या कीटकांपासून संरक्षण मिळविण्यासाठी चहाच्या बागांमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. या कीटकनाशकांचा पानांवर काही प्रमाणात अंश राहतो.
कीटकनाशक फवारल्यानंतर साधारणतः १० ते २० दिवसांनी पानं तोडली जातात. चहाच्या झाडांवर मारलेली कीटकनाशके चहाच्या पावडरमध्ये उतरतात आणि तीच चहाच्या पावडरमध्ये सापडतात. आज बाजारात मिळणारी कोणतीही खाद्यवस्तू, भाजी किंवा फळ यापैकी काहीही प्रयोगशाळेत नेऊन तपासले तर त्यात अशा कीटकनाशकांचा आणि रसायनांचा अंश सापडणार आहे.
आता चहामध्ये कीटकनाशक आणि रसायने सापडल्यामुळे मागणीत घट झालीय. त्यामुळे देशांतर्गत बाजारात ही चहाचे दर घटले आहे. चहाच्या पानात कीटकनाशके आणि रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने खरेदीदारांनी ते घेण्यास नकार दिलाय. आता चहाचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी घसरले आहेत. गेल्या महिन्यात चहाच्या किमतीत २७ रुपयांची घट झाली आहे. देशात विकला जाणारा सर्व प्रकारचा चहा भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या मानदंडांचे पालन करत असल्याचा दावा केला जातोय. मात्र ‘बिझनेस लाइनने’ दिलेल्या बातमीनुसार, कोलकाता लिलावात खरेदीदारांनी सुमारे ३९ हजार किलो चहा परत पाठवला. मागच्या वर्षी २२६.७७ रुपये किलो दराने चहा विकला गेला होता, मात्र यंदा त्याचा सरासरी भाव १८६.४१ रुपये किलो आहे.
आसाम आणि चहा उत्पादक राज्यांमध्ये पाऊस अधिक असल्याने त्याचा फटका चांगल्या गुणवत्ता असलेल्या चहाला बसला आहे. त्यामुळे कडक चहा पिण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. तर सुमार दर्जाच्या चहाचे दर स्थिरावलेले आहेत.
- अनिल अहिरकर, माजी अध्यक्ष, विदर्भ टी मर्चंट असोसिएशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.