काही राहिलेल्या गोष्टींचा पूर्ण होताहे बॅकलॉग! 

file photo
file photo
Updated on

नागपूर : कवी, लेखकांच्या आयुष्यात कायम "लॉकडाउन' असतोच. या वेळी तो दुहेरी आहे. यात काही नकारात्मक पैलू असले, तरी सकारात्मकतेची किनारही आहे. अडगळीत पडलेल्या अनेक विषयांना स्पर्श करण्याची काहींना संधी मिळाली आहे. काहींनी नवीन प्रोजेक्‍टवर काम सुरू केले आहे. काहींनी जुन्या फायलींवरची धूळ झटकली, तर अनेकांनी घरकाम, पाककलाही शिकून घेतली. उद्याचा सूर्य मंगलमय प्रकाश घेऊन येईल, ही भावना सर्वांचीच आहे. या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया... 

सर्जनशीलतेला नवे अंकुर फुटले 
मला साधा चहासुद्धा बनवता येत नव्हता. आता उत्तम भाजी बनवू शकतो. पुस्तकांच्या रॅकजवळ दिवसातून तीन-चार वेळा जाऊन आवडीच्या ग्रंथांचा धांडोळा घेतोय. घरात सर्जनशीलतेचे अंकुर फुटलेत. मुलांसोबत कॅरम, बुद्धिबळ खेळतोय. आतापर्यंत पाहिले नसतील तेवढे हिंदी, मराठी चित्रपट व वाहिन्या या काळातच बघितल्या. या वेळी झाडांना पाणी देणे, परिसर स्वच्छता करीत आहे. खूप दिवसांनंतर घरी सहभोजनाचा आनंद अनुभवत आहे. "लॉकडाउन'च्या कविताही लिहिल्या. एकाच जागेवर बसून व झोपून राहण्याची ही पहिलीच वेळ. "वर्क फ्रॉम होम' म्हणून या काळात विद्यार्थ्यांना टीचिंगही केले. लिखाणाचा बॅकलॉग कमी केला. 
-प्रा. डॉ. अशोक इंगळे 
कवी, समीक्षक, आकोट 

काही दिवाळी अंक, पुस्तकं वाचत आहे 
मुंबईची धावपळ अंगवळणी पडलेली असल्याने सुरुवातीला काय करावं काही सुचत नव्हतं. पण, कधी नव्हे ते मुलांना, बायकोला वेळ देता आला. कोरोनासंदर्भातल्या बातम्या ऐकून अस्वस्थ वाटत होतं; म्हणून टीव्ही बंद करून टाकला. आवडलेली पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मनोज बोरगावकर यांची "नदिष्ट' कादंबरी, दिवाकर चौधरी यांचं आत्मकथन "स्क्रिझोफ्रेनिया', बालाजी सुतार यांचा कथासंग्रह "दोन दशकाच्या सांध्यावरच्या नोंदी', ऍन फेल्डहाउस यांचे "नदी आणि स्त्रीत्व, दा. गो. काळे यांचा कवितासंग्रह "अरण्याहत', काही दिवाळी अंक व नियतकालिकं वाचत आहे. त्याला कारण बाहेर हे जे काही सुरू आहे त्याची चिंता आणि भीती. लवकरच हे वातावरण निवळो. सर्व पूर्ववत होवो. 
-नामदेव कोळी 
कवी, संपादक, डोंबिवली 

अधिक वाचा : बीडीओने का दिला कामावर रुजू होण्यास नकार? 
 

भूतकाळात फिरून आलो 
नेहमीच्या दिवसात कामाच्या निमित्ताने आपण दिवसातला बराच वेळ बाहेर असतो. पण, लॉकडाउनच्या निमित्ताने घरात, घरातल्या वातावरणात आपल्याला बराच काळ निवांतपणे राहता आलं. एरवी घरातली छोटी-छोटी कामं आपण घरातल्या स्त्रीवर टाकून निर्धास्त होतो. पण, सध्याच्या काळात घरातल्या या छोट्या-छोट्या कामांमधला आनंद जवळून पाहता आला...घेता आला. स्वतःच्या हाताने केलेले पोहे वेगळाच आनंद देऊन गेले. टीव्हीवरची टॉम अँड जेरीची सिरीयल पाहून मुलांसारखा मनमुराद हसलो. आवराआवर करताना सापडलेल्या जुन्या फोटोंनी भूतकाळात फिरवून आणलं. 
घराच्या बाहेर जेवढं विश्‍व आहे, त्याहूनही मोठं विश्‍व चार भिंतींच्या आत... आपल्याच घरात आहे, हे यानिमित्ताने कळलं. 
-प्रशांत असनारे 
कवी, अकोला 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.