Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत यापुढे एकही अपशब्द उच्चारल्यास आक्रमक प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे पक्षनेते उद्धव ठाकरे यांना दिला.
त्यामुळे राज्यात शांतता भंग झाल्यास त्याला जबाबदारसुद्धा तुम्हीच राहाल, असेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसैनिकांच्या मेळाव्यात फडणवीसांना उद्देशून नागपूरचा कलंक असा शब्दप्रयोग केला होता. त्यामुळे भाजपमध्ये चांगलाच संताप निर्माण झाला आहे.
ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर बावनकुळे म्हणाले, ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे ते काहीही बरळतात. त्यापेक्षा त्यांनी मनोरुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.
कमिशनसाठी प्रकल्प रोखले
उद्धव ठाकरे कलंकित आणि करंटेसुद्धा आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे यांनी कमिशनसाठी मेट्रो रेल्वे व बुलेट ट्रेनचा प्रकल्प रोखला होता. समृद्धी महामार्गाला विरोध केला. शेतकरी पिक विमा योजना देणाऱ्या कंपन्यांना लाखो रुपये दिले.
कोविडच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडून घरकोंबड्यांप्रमाणे स्वतःला घरात कोंडून घेतले होते. मी, मुलगा आणि पत्नी एवढेच विश्व त्यांचे होते.
हे आहे फडणवीसांचे कर्तृत्व
फडणवीस यांचा नगरसेवक, महापौर, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष, राज्याचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना दिली.
शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून दिली. राज्याला भारनियमनमुक्त केले. सर्वाधिक मेट्रो नेटवर्कची उभारणी राज्यात केली. मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन केला. त्यामाध्यमातून १५ लाखांच्यावर नागरिकांना आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवले होते.
कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या. स्वतः सरकारी इस्पितळात भरती झाले होते असे बावनकुळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, अरविंद गजभिये, जयप्रकाश गुप्ता, अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे विरुद्ध गुन्हा दाखल करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपच्या विधी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी जाणुनबुजून असे वक्तव्य करत समाजात तेढ निर्माण करत राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. विधी आघाडीचे अध्यक्ष ॲड. परीक्षित मोहिते यांच्या नेतृत्वात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली.
फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याबाबत वक्तव्य सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. ठाकरेंच्या अभद्र भाषेमुळे भाजपच्या कार्यकर्ते व सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करावी, अशी मागणी या तक्रारपत्राद्वारे करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.