श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने सुरू केलेला आरोग्य सेवेचा यज्ञकुंड असाच निरंतर सुरू ठेवावा. डायग्नोस्टिक सेंटरमुळे आजाराचे निदान अचूक होईल. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविता येईल. म्हणूनच डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाचे असून सरकार व मी पाठीशी आहे, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या विविध सेवाभावी उपक्रमाच्या शृंखलेतील श्रीरामनगर, पावनभूमी स्थित गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, आशिष जयस्वाल, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार डॉ. परिणय फुके, श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव पराग सराफ, मोल काळे, ॲड. अक्षय नाईक, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते. मला काय मिळाले, यापेक्षा मी समाजाला काय देणार या वृत्तीची माणसे महाराष्ट्रात आहेत. ही आपली संस्कृती आणि परंपरा असल्याचे नमुद करीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रुग्णसेवा, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनसाख्या संस्थेची समाजाला गरज आहे. शासन आपले काम करत असते.
शासनाने घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत. गेल्या अगदी अलीकडच्या काळात देखील सरकारने महिलांची, मुलांची तपासणी माफक दरात उपलब्ध करून देत आरोग्य सेवा बळकट करण्यावर अधिक भर दिला आहे. असे असताना देखील रुग्णांची वाढती संख्या बघता कुठल्याही आजाराचे निदान वेळेवर आणि अचूक होणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच अशा प्रकारची सेंटर ही काळाची आणि समाजाची गरज आहे.
या सेंटरला गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी आपले जीवन जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचाच वारसा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे नेत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संदीप जोशी यांनी संस्थेच्या प्रमुख कार्याची माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा अत्यल्प दरामध्ये एमआरआय सेंटर, सीटी स्कॅन सेंटर, एक्स रे, पॅथॉलॉजी त्याचप्रमाणे २५ डायलेसिस मशीनने परिपूर्ण डायलेसिस सेंटर निर्माण करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
गंगाधराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्यसेवा अल्प दरामध्ये पुरविल्या जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे सचिव पराग सराफ यांनी मानले.
आता आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार काळाजी गरज; फडणवीस अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासह आता शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार ही काळाची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. उपचार पद्धतीमध्ये खूप बदल झालेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्व. गंगाधरराव फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या मनात एक मोठे स्थान प्राप्त केल्याचे सांगितले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्वाचे कौशल्य होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी समर्पित भावनेने काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. मुंबईतील आमदार निवासातील त्यांची खोली म्हणजे अनेक गोरगरीब जनतेच्या हक्काचे स्थान होती, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.