मौदा (जि. नागपूर) : मौदा पोलित ठाण्याच्या हद्दीतील कामठी तालुक्यातील भूगाव येथे शनिवारी (ता.25) सायंकाळच्या सुमारास अविवाहित मोठ्या भावाने विवाहित लहान भावाचा लाकडाचा दांडका डोक्यावर मारून खून केल्याची घटना घडली. मृताचे नाव दशरथ विजय वंजारी (वय 32) आहे. दशरथला पत्नी दुर्गा (वय 27), दोन मुली प्रांजली (वय 7) लावण्या (वय 6) आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील भूगाव येथे भूमिहीन शेतमजूर विजय पिसाराम वंजारी हे त्यांची दुसरी पत्नी सुमित्रा व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मोठा मुलगा विकास अविवाहित असून, लहान मुलाचे लग्न झाले. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. वडील व दोन्ही मुलांना दारूचे व्यसन होते. विवाहित असलेला लहान मुलगा दशरथ दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत नेहमीच खटकेही उडत होते. पत्नीसोबतच तो आई-वडिलांनाही मारहाण करायचा. सततच्या कलहामुळे मागील काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती परत आली.
दशरथ वंजारी हा दुपारी चार वाजता नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला व काही ना काही कारणावरून त्याने पत्नीसोबत वाद उकरून काढला. पत्नीसोबत भांडण करायला लागला. दरम्यान, आई-वडील मध्ये पडले. त्याने आई-वडिलांना थापडा मारल्या. यावेळी वडील व भाऊ विकाससुद्धा दारू पिऊन होते. मोठा भाऊ विकासचा राग अनावर झाल्याने रोजरोज तू बायकोशी भांडण करतो म्हणून कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने दशरथच्या डोक्यावर, पायावर व पाठीवर मारल्याने दशरथ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत घरीच पडून राहिला. घरच्यांनी सुद्धा सायंकाळपर्यंत कुठेच वाच्यता केली नाही. सायंकाळी अंधार पडल्यावर सात वाजताच्या सुमारास त्याची पत्नी व मोठा भाऊ विकास याने अपघाताचे झाल्याचे भासवीत गावातीलच सुदाम आंबीलडुके यांच्या गाडीने कु हीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. याबाबत कुही पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला. घटनास्थळ मौदा पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने याची सूचना मौदा पोलिस स्टेशनला दिली. मृताची पत्नी व मोठा भाऊ विकास यांच्या अनैतिक संबंधातून या दोघांच्या संगनमताने लहान भावाची हत्या केल्याचे गावात बोलले जात आहे. रविवारी मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मौदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर गीते यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक मंगेश काळे, पोलिस उपनिरीक्षक आगासे, मेजर जंगवाड, हवालदार बोरकर, लांजेवार करीत आहेत.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.