नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने भारतीय जनता पक्ष आणि जोरबैठकांना वेग आला आहे. याचदरम्यान,भाजपच्यावतीने माईंड गेम खेळला जात असून काँग्रेस चक्क आपला उमेदवारच बदलवणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसतर्फे बैठक घेऊन मतांची जुळवाजुळव झाली असल्याचा संदेश पोचवण्याचा खटाटोप सुरू आहे.
भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री तसेच प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. बुधवारी (ता.८) सर्व मतदारांना नागपूरच्या जिल्ह्याच्या सीमेवर आणण्यात येणार आहे. तेथून थेट मतदान केंद्रावर नेण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत सुमारे ३३४ मतदारांना सहलीला पाठवण्यात आले आहे. एकूण ५६० मतदारांपैकी पन्नास टक्के मतदार सोबत असल्याने विजय निश्चित आहे. सुमारे ४०० मते आमच्या उमेदवाराला पडतील असा दावा भाजपचे नेते करीत आहेत.
दुसरीकडे काँग्रेस रवींद्र भोयर यांच्यासाठी प्रयत्न करीत नसून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ते कुठेच दिसत नाहीत. अद्याप ते काँग्रेसच्यासुद्धा नगरसेवकांनाही भेटले नाहीत अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसच्या तीन प्रमुख नेत्यांनी कॉटेज क्रमांक पाचवर बैठक घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे जिल्ह्यातील तीनही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस कामाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मी कुठेही गेलो नाही. सातत्याने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. प्रचारसभा, यात्रा काढून प्रचाराचा धुरळा उडवून देणारी ही निवडणूक नाही. योग्य व्यक्ती आणि मतदारांच्या आपण संपर्कात आहोत. भाजपला मते फुटण्याची भीती असल्याने त्यांनी मतदारांना सहलीला नेले. धनशक्तीच्या जोरावर भाजप निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यांना यश येणार नाही.
-रवींद्र भोयर,उमेदवार काँग्रेस
पराभव दिसत असल्याने काँग्रेस उमेदवार बदलणार आहे. पण तिसरे उमेदवार मंगेश देशमुख हेसुद्धा भाजपचेच आहेत. त्यांचे सूचक म्हणून भाजपच्या सहा नगरसेवकांनी त्यांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारही आयात करावा लागतो यावरून काँग्रेसची काय अवस्था आहे हे दिसून येते. चंद्रशेखर बावनकुळे ४०० मते घेऊन निवडून येतील.
-प्रवीण दटके, शहराध्यक्ष भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.