दिग्रस (जि. यवतमाळ) : नागपूरच्या कामठी येथील कन्हान नदीपात्रात युवक बुडालेल्या घटनेतील दुसरा मृतदेह १०० मीटरच्या अंतरावर तर १६ किलोमीटर अंतरावर तिसरा मृतदेह सोमवारी (ता. ६) दुसऱ्या दिवशी हाती लागल्याची माहिती आहे. हे युवक नदीपात्रात बुडत असलेल्या युवक मित्रांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते.
दिग्रस येथील बाराभाई मोहल्ला परिसरातील १२ युवक बाबा ताजोद्दीन यांच्या संदलमध्ये सहभागी होण्यासाठी शनिवारी मध्यरात्री गेले होते. संदल रद्द झाल्याने ते रविवारी दर्गाहच्या बाहेरून दर्शन घेऊन जवळच असलेल्या कामठी येथील अम्माची दर्गा येथे दर्शनासाठी गेले. कन्हान नदीजवळच त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरवून गाडीतच सर्व जण झोपले.
अशात १२ युवकांपैकी पाच युवक जवळच असलेल्या कन्हान नदीपात्रात अंघोळ करण्याच्या उद्देशाने उतरले. यावेळी खोलीचा अंदाज न लागल्याने एक जण पाण्यात ओढला जात असल्याचे लक्षात आले. पाहिल्याला वाचवण्यासाठी दुसरा, त्याला वाचवण्यासाठी तिसरा, तिसऱ्याला वाचवण्यासाठी चौथा व या चौघांना वाचवण्यासाठी पाचवा पाण्यात उतरला. मात्र, त्यांना पाण्याने आत ओढले.
रविवारी कामठी पोलिस व एस.डी.आर.एफ. पथक नागपूरने शोधमोहीम राबविली असता मिर्झा ख्वाजा बेग या युवकाचा मृतदेह सापडला होता. रात्र झाल्याने रविवारी शोधमोहीम थांबवण्यात आली होती. मात्र, सोमवारी (ता. ६) सकाळपासून पुन्हा युद्धस्तरावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेत घटनेच्यावेळी शेवटी चारही मित्रांना वाचवण्याच्या उद्देशाने पाण्यात गेलेल्या सय्यद अरबाज ऊर्फ लकी या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी घटनास्थळापासून १०० मीटरच्या अंतरावर हाती लागला.
मित्रांना वाचवण्यासाठी उतरलेल्या म. सिफतैन म. इकबाल या युवकाचा मृतदेह घटनास्थळापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव (ता. पारशिवणी) परिसरात आढळल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. नदीपात्रात बुडालेल्या पाच युवकांपैकी तीन युवकांचे मृतदेह हाती लागले असून इतर दोन युवकांचे मृतदेह सपाण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहे. कामठी पोलिस व एस.डी.आर.एफ. पथक नागपूर कडून कन्हान नदी परिसरात शोधमोहीम राबवणे सुरू आहे.
रात्री दोन वाजता दफनविधी
कन्हान नदीपात्रात बुडालेल्या पाच युवकांपैकी मिर्झा ख्वाजा बेग या युवकाचा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास हाती लागला होता. कामठी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला. मृतदेह दिग्रस येथे बेग यांच्या घरी आणण्यात आला आणि रविवारी रात्री २ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात मुस्लिम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.