लग्नसमारंभ लॉकडाउन; डहाका कलावंतांच्या कलेला "ब्रेक'; कसे जगतील "ते'....

केळवद  :  लग्नप्रसंगी डहाका सादर करताना लोककलावंत.
केळवद : लग्नप्रसंगी डहाका सादर करताना लोककलावंत.
Updated on

केळवद (जि.नागपूर)  :  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच ठप्प पडले आहे. याचा मोठा परिणाम समाजातील सर्वच घटकावंर पडल्याचे दिसून येते. अशात ग्रामीण भागात हिंदू पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या लग्नसोहळ्यात लग्नाच्या आदल्या दिवशी सादर करण्यात येणारी डहाका परंपरा आणि सादरीकरण करणाऱ्या डहाका कलेला "ब्रेक' लागल्याने लग्नाच्या मोसमात कलेवर गुजराण करणाऱ्या कलावंतांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

हिंदू धर्मातील परंपरा
घरच्या लग्नसोहळ्यात मृत पावलेल्या नातेवाईक आणि आप्तांना आमंत्रित करण्यासाठी हिंदू धर्मात डहाका हा प्रकार प्रसिद्ध आहे. काळाच्या ओघात ही पारंपरिक संगीतकला लोप पावत चालली आहे. ही परपंरा जिवंत राहावी तसेच नव्या पिढीला त्यात जोडता यावे याची सर्व जबाबदारी डहाका सादर करणाऱ्या कलावंतांवर आलेली आहे. घरच्या लग्नसोहळ्यात प्रत्येक नातेवाईक उपस्थित राहावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. त्यात अगदी जग सोडून गेलेले नातेवाईकही आत्मारूपाने उपस्थित असायला हवे, त्यांनीही या शुभप्रसंगी नववधूवरांस आशीर्वाद द्यावा, अशी कल्पना केली जाते.

मृतात्म्यांचे झाले विस्मरण
मृत पावलेले लोक आता कधी येणार नाहीच, हे सत्य असूनही त्यांना संगीतवाद्याच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून निमंत्रण देणारी ही प्रथा आहे. लग्नाच्या आदल्या रात्री या डहाका गाणाऱ्यांना बोलावण्यात येते. पुढे कुटुबांतील प्रत्येक मृत व्यक्तीचे नाव घेत त्यांचे कर्तृत्व आठवण तालासुरात त्यांना लग्नात येण्याचे आवाहन करण्यात येते. घुगंरू बांधलेले ढोलक वाद्य, टाळ आदी वाद्याच्या संगीतासह आरोळ्या देत मृतांना आवाहन केले जाते. रात्रभर चालणारा संगीताचा हा फड इतका भावनिक असायचा की कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यातील अश्रू यायचे. अशाप्रकारे कुटुंबातील मृत आत्म्यांची आराधना केल्याने समोर होणारा लग्नसोहळा सुरळीत पार पडेल, ही भावना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर असायची. काळाच्या ओघात ही प्रथा लोप पावत जरी असली तरी ती जोपासणाऱ्या डहाका कलावंतांना या वर्षी लग्न सोहळे नसल्याने वीस ते तीस हजार रुपयांच्या कमाईवर पाणी फेरावे लागले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

लग्नसोहळेच नसल्याने संकट
लग्न सोहळ्यात कुटुंबातील मृतात्म्यांना आमंत्रित करण्यासाठी विशेषता हिंदू धर्मात खास करून लग्नाच्या आदल्या रात्री डायका हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जातो. यातून डायका कलावंत एका लग्न सोहळ्याचे दोन ते तीन हजार घेत असल्याने सिजनमध्ये डहाका सादर करणारे कलावंत पंचवीस ते तीस हजार रुपये सहज कमावतात. यामध्ये विशेष करून नाभिक समाजाचे लोक हा कलाप्रकार सादर करतात. आधीच सलूनचे दुकाने बंद आणि लग्नसोहळे नसल्याने डहाकाचे कार्यक्रमच उरले नाहीत. यामुळे नाभिक समाजावर दुहेरी संकट आले आहे.
कमलाकर काऊलकर
डहाका कलावंत, केळवद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.