Crime News : भावाने काढला भावाचा काटा! चोवीस तासांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी

गेल्या चोवीस तासात झालेल्या दोन खुनांच्या घटनेने शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Murder
MurderSakal
Updated on

नागपूर - गेल्या चोवीस तासात झालेल्या दोन खुनांच्या घटनेने शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात खुनाच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

पहिली खुनाची घटना तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिमाबाई पेठ, टिमकी येथे रविवारी घडली. आईला शिवीगाळ करण्यावरून झालेल्या वादात थोरल्याने धाकट्या भावाच्या गळा चिरून खून केला. गौरव ऊर्फ गुड्डू गोखले (३५) असे मृताचे नाव आहे. गौरव आणि दिलीप (५१) हे दोघे सख्खे भाऊ. आरोपी दिलीप वरच्या माळ्यावर तर गौरव हा खाली आईसोबत राहात होता.

दिलीप हा विवाहित असून पत्नी सोडून गेल्याने एकटाच राहात होता. तो दररोज दारूच्या नशेत येऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करायचा. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ९ वाजता तो दारू पिऊन घरी आला. आईला शिवीगाळ केली. त्यामुळे गौरव चिडला व दोन्ही भावात वाद झाला. दिलीपने चाकूने गौरवच्या गळ्यावर वार केले. तो रक्तबंबाळ झाला. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी दिलीपला ताब्यात घेतले.

खुनाचे सत्र सुरूच

शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत चालली असून टोळीयुद्ध, वर्चस्वाचा वाद, ड्रग्स तस्करी व विक्री, प्रॉपर्टी वाद आदी कारणातून गेल्या महिनाभरापासून खुनाच्या घटना वाढत आहेत. पोलिसांचा धाक उरला नसून नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

पारडीत वर्चस्वाच्या वादातून हत्या

वर्चस्वाच्या वादातून खुनाची दुसरी घटना पारडीच्या भवानीनगरात रविवारी रात्री घडली. रोहन देविलाल डांगे (२४) या तरुणाची चार आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. नंदकिशोर ऊर्फ काल्या देविदास कुंभलकर (३७) रा. वाडी, गौरव संजय कालेश्वरवार (२७) रा. प्रेमनगर झेंडा चौक, राज मणिराम कुंटलवार (३१) आणि शुभम कमलकिशोर बेलेकर (२७) रा. रेणुकानगर पारडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आरोपी नंदकिशोर हा पूर्वी भवानीनगर परिसरातच राहत होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. मार्च २०२३ मध्ये नंदकिशोर आणि गौरवला १ कोटी ९० लाख रुपयांच्या ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला. तेव्हापासून तो वाडीतून एमडीचा धंदा करत होता.

नंदकिशोर परिसरातून गेल्यानंतर रोहन आणि त्याचा भाऊ रोहित परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या २३ एप्रिलला नंदकिशोर आणि रोहनचा भाऊ रोहित यांच्यात दारू पार्टीत वाद झाला. नंदकिशोरने त्याला मारहाण केली होती. रोहितने नंदनवन ठाण्यात याची तक्रारही केली होती. तेव्हापासून नंदकिशोर त्याला धडा शिकविण्याची संधी शोधत होता.

रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रोहन हा त्याचे मित्र राज रामटेके आणि आनंद पाठक यांच्यासोबत भवानीनगरच्या मानकरवाडी मैदानात बोलत उभा होता. दरम्यान नंदकिशोर व इतर आरोपी दुचाकी वाहनांनी तेथे आले. त्यांनी रोहितबाबत विचारपूस केल्यावरून रोहनशी त्यांचा वाद झाला. आरोपींनी रोहित ऐवजी रोहन यालाच चाकूने सपासप भोसकून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. माहिती मिळताच रोहित घटनास्थळी पोहोचला आणि रोहनला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.