लग्नाला विरोध केल्याने प्रियकराचे राक्षसी कृत्य; प्रेयसीच्या आजीचा व भावाचा निर्घृण खून

Brutal murder of grandmother and brother in Nagpur
Brutal murder of grandmother and brother in Nagpur
Updated on

नागपूर : प्रेम आणि लग्न करण्यास विरोध केला म्हणून एका माथेफिरू युवकाने प्रेयसीची आजी आणि लहान भावाचा धारदार चाकूने अत्यंत निर्घृण खून केला. शहरातील हजारीपहाड परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रमिला मारोती धुर्वे (वय ७०, रा. हजारीपहाड) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) असे खून झालेल्या आजी-नातवांची नावे आहेत. आरोपी हा अल्पवयीन आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन धुर्वे हे व्यवसायाने पेंटर असून मुलगी गुंजन (वय २०, बदललेले नाव), मुलगा यश, पत्नी व आईसह हजारीपहाड परिसरात वास्तव्यास आहेत. गुंजन पदवीचे शिक्षण घेत होती तर यश हा सहाव्या वर्गात शिकत होता. गुंजनची गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘इंस्टाग्राम’वरून तहसील परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मोहंमद (बदललेले नाव) याच्याशी ओळख झाली.

गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेल्या मोहंमदने गुंजनशी फोनवरून मैत्री करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गुंजनही त्याच्या प्रेमात अडकली पण तिला मोहंमदच्या मनाचा थांगपत्ता लागला नाही. मैत्री घट्ट झाल्याने त्याला घरी नेत गुंजनने मित्र म्हणून ओळख करून दिली. याचाच फायदा घेत मोहंमद वारंवार घरी येऊ लागला.

दोघांचे संबंध केवळ मैत्रीपुरते नसून ते आणखी पुढे गेल्याचे गुंजनच्या वडिलांना समजले. त्यांनी दोघांचीही समजूत घालून वेगळे केले. पण हे वेगळे होणे तात्पुरते ठरले. दोघे पुन्हा भेटू लागले. दोघांचेही एकमेकांना फोटो पाठवणे आणि चॅटिंग करणे सुरू होते. मोहंमदशी फोनवरून बोलत असताना आजी प्रमिला आणि भाऊ यश यांनी बघितले.

त्याच कारणावरून सायंकाळी घरात राडा झाला. आईने तिला मारहाण केली तर वडील रागावले. दुसऱ्या दिवशी मोहंमद मोठा चाकू घेऊन तिच्या घरी आला. गुंजनवर प्रेम करीत असल्याचे सांगून आम्ही लग्न करणार असल्याचे दरडावून सांगितले. कुणी प्रेमास विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीचा मोहंमद गुंजनला भेटायला घरी येत असल्यामुळे कुटुंबीय दहशतीत आले होते.

खुर्चीवर बसलेल्या आजीच्या पोटातच खुपसला चाकू

घरच्यांनी समजावून सांगितल्याने म्हणा की अन्य काही कारणांमुळे गुंजन गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगार प्रवृत्तीच्या मोहंमदशी फटकून वागत होती. भेटणे टाळत होती. आजीने रागावल्यामुळेच गुंजन अशी वागत असल्याचा समज त्याने करून घेतला. गुरुवारी (ता. १०) दुपारी मोहंमद तिच्या घरी आला आणि खुर्चीवर बसलेल्या प्रमिला यांच्यावर अकस्मात चाकू हल्ला केला.

यशची त्याला थोडीही दया आली नाही

धारधार चाकूच्या वाराने प्रमिला यांच्या पोटातील कोथडा बाहेर काढला. त्याचवेळी दुर्दैवाने दहा वर्षाचा यश शौचालयाकडून घराकडे येत होता. आजीला रक्ताच्या थारोळ्यात बघताच त्याने किंचाळी मारली. यशला पाहताच पाशवी वृत्तीचा मोहंमद त्याच्याही पाठीमागे धावला. जिवाच्या भीतीने चिमुकला यश परत शौचालयाकडे पळाला पण आरोपीने त्याला गाठले. लहानग्या यशची त्याला थोडीही दया आली नाही आणि त्याच्या पोटातही मोहंमदने चाकू खुपसून खून केला.

इंस्टाग्रामवरून झाले प्रेम

गुंजनची इंस्टाग्रामवरून अरबू नावाच्या युवकाशी ओळख झाली होती. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मोहंमद हा अरबूचा मित्र होता. त्याने अरबूच्या मोबाईलमधून गुंजनचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला फोन केला. ‘तू मला खूप आवडते. तुझ्या अरबूला ५ गर्लफ्रेंड आहेत. त्याला सोड आणि माझ्याशी प्रेम कर’ असे सांगितले. अरबूने धोका दिल्यामुळे ती मोहंमदच्या प्रेमात पडली. मात्र, दोघेही धोकेबाज असल्याचे गुंजनला कळू नये हे मात्र, न समजण्यासारखे आहे.

गुंजनशी होत नव्हता संपर्क

गेल्या १५ दिवसांपासून गुंजन मामाकडे होती. शिवाय तिचा मोबाईल आई- वडिलांनी घरीच ठेवून घेतला होता. त्यामुळे मोहंमदचा गुंजनशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे तो संतापला. तिच्याशी बोलण्यासाठी आणि तिला घेऊन जाण्यासाठी तो सतत धडपड करीत शोध घेत होता. १० दिवसांपूर्वीच तो तिच्या घरी गेला. तिच्या लहान भावाला मारहाण करीत ‘तुझी बहीण कुठे गेली सांग नाहीतर मारतो’, अशी तो सतत धमकी देत होता. मात्र, काही केल्या त्याला गुंजनचा पत्ता लागला नाही.

मोहंमद करायचा ब्लॅकमेल

मोहंमदच्या प्रेमात वेडी झालेल्या गुंजनने त्याला काही फोटो पाठवले होते. त्यानंतर तो तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी द्यायला लागला. बळजबरीने तिला गाडीवर फिरवायला लागला. तिचे फोटो डिलीट करण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या करीत होता. त्यामुळे गुंजन त्याचा फोन आला की भीतीपोटी भेटायला जात होती. यापूर्वी गुंजनला मोहंमदने अनेकदा जबर मारहाण केल्याची माहिती नाईवाईकांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.