नागपूर : भूखंड विक्रीचा करार करून लाखो रुपये उकळल्यानंतरही विक्रीपत्र करून न देता दोन ग्राहकांची तब्बल 50 लाखांनी फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण बेलतरोडी हद्दीत उघडकीस आले.
शिबू मॅथ्यू असे आरोपीचे नाव असून, तो वर्धा मार्गावरील हिंदुस्तान कॉलनीत राहतो. त्याचा इंटेरियर डेकोरेटरचा व्यवसाय होता आणि अजनी चौकातील एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय होते.
अवश्य वाचा - ‘या’ वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत
अमरावती मार्गावरील रहिवाशी प्रशांत झुलकंठीवार (51) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ते बिल्डर असून, दिलीप हिराणी त्यांचे भागीदार आहेत. झुलकंठीवार आणि हिराणी यांनी शिबूच्या मालकीचे मौजा शंकरपूर खसरा क्रमांक 116 /1 मधील 10 हजार चौरस फूट जमीन 18 लाख रुपयात घेण्याचा सौदा केला होता. 14 फेब्रुवारी 2006 रोजी 2 लाख 50 हजारांचे टोकन देऊन करारनामा केला. त्यानंतर वेगवेगळी अशी एकूण 13 लाखांची रक्कम दिली. उर्वरित 5 लाख रुपये जमिनीचा ले-आउट प्लॅन मंजूर झाल्यानंतर विक्रीपत्र करतेवेळी देण्याचे ठरले. सप्टेंबर 2006 मध्ये ही जमीन एनए (अकृषक) झाली. त्यावर प्लॉट पाडल्यानंतर 4, 14, 15 आणि 16 क्रमांकाचे चार भूखंड (एकूण 10 हजार चौरस फुटाची जागा) ताबा देऊन तसे पत्रही शिबूने झुलकंठीवार यांना दिले. हा ताबा घेताना पुन्हा 3 लाखांचा धनादेश शिबू यांना दिला. दरम्यान 2007-08 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जमीन पुन्हा कृषक केली. परिणामी या जागेवर अभिन्यास मंजूर करणे शक्य झाले नाही. 2018 मध्ये नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट ऍथॉरिटीचा नवीन विकास आराखडा मंजूर झाल्याने ही जमीन रहिवासी विभागात समाविष्ट केली. एकूण 16 लाख देऊनही त्यांना जमीन मिळाली नाही.
दरम्यान, गिरीश गुंडावार यांनीही शिबूकडून उर्वरित जमीन 99 लाखांत खरेदीचा करार केला. ठरल्याप्रमाणे 34 लाखही दिले. शिबू जमीन नावे करून देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करीत होता, तर झुलकंठीवर आणि गुंडावार सातत्याने त्याच्या मागे लागले होते. त्याच सुमारास ही जागा मेट्रो रिजनमध्ये गेली. 16 एप्रिल 2018 रोजी शिबूने ले-आउट मंजुरीसाठी अर्ज केला. पण, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नाही. यामुळे अभिन्यासाची परवानगी मिळू शकली नाही.
झुलकंठीवार आणि गुंडावार हे दोघेही जमिनीचे विक्रीपत्र करून देण्यासाठी शिबूच्या मागे लागले होते. परंतु, तो टाळाटाळ करीत राहीला. एनएटीपी झालेला प्लॉट विक्रीचा कारारनामा दोघांनाही करून दिला. पण, हा व्यवहार पूर्णत्वास जाण्यापूर्वीच शिबूने जमिनीच्या सात बारावर पत्नी आणि दोन मुलांची नावे समाविष्ट केली आणि करार झाल्यानंतरही रक्कम घेऊनही जमीन विकण्यास नकार देत फसवणूक केली. झुलकंठीवार यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखा करीत असल्याची माहिती बेलतरोडीचे पोलिस निरीक्षक विजय आकोट यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.