नागपूर - ‘देशात सर्वाधिक लोकसंख्या इतर मागास वर्गीयांची (ओबीसी) आहे. दलितांची १५ टक्के तर आदिवासींची संख्या १२ टक्के एवढे आहे. मात्र, देशातील सनदी अधिकाऱ्यांच्या यादीत फक्त दोन-चारच ओबीसी अधिकारी सापडतील. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही हेच चित्र दिसून येते.
या माध्यमातून भाजपला सामाजिक आरक्षण मोडीत आणायचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल आणि लोकसंख्येनुसार प्रत्येक समाजाला त्याचा वाटा दिला जाईल,’ अशी घोषणा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपूरमधील दिघोरी येथील पटांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि देशभरातील सातशे आमदार आणि खासदार उपस्थित होते.
यात तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खु, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. काही कारणास्तव सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित नव्हत्या.
राहुल गांधी म्हणाले, ‘नागपूर येथील कार्यकर्त्यांना आमचे विचार आणि संदेश लगेच समजताच. म्हणूनच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला कर्मभूमी केले होते.’ काँग्रेससाठी नागपूर व महाराष्ट्राचे स्थान विशेष असून, येथून सुरू केलेल्या परिवर्तनाच्या लाढाईत आम्ही नेहमी विजयी झालो आहोत, असे सांगत राहुल यांनी, आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच जिंकेल असे भाकीत वर्तविले.
‘राजेशाही आणेल’
राहुल गांधी म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसने ब्रिटिशांसोबत राजेशाही विरोधातही लढा दिला. काँग्रेसने संविधानाची निर्मिती करून गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बहाल केला. प्रत्येकाच्या मताची किंमतही सारखीच ठेवली. मात्र, दहा वर्षांच्या काळात भाजपने लोकांचे हित आणि लोकशाही जपणाऱ्या सर्व संस्था बंद पाडण्याचे काम केले आहे. त्यांना पुन्हा या देशात राजेशाही आणायची आहे.’
आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला म्हणून त्यांना भाजपमधून बाहेर पडावे लागले, असे सांगत राहुल गांधी यांनी, काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आमच्याशी थेट बोलू शकतो, असे सांगितले. ते म्हणाले, ‘भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी कोणताही कार्यकर्ता थेट बोलू शकत नाही. काँग्रेसमध्ये मात्र प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला थेट प्रश्न विचारू शकतो. आमचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असतो.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.