नवे महापौर दयाशंकर तिवारींपुढे आव्हानांचा डोंगर; पक्षाची ‘विकेट’ वाचविण्यासाठी लागणार कस

Challenges in front of Mayor Dayashankar Tiwari in Nagpur Latest News
Challenges in front of Mayor Dayashankar Tiwari in Nagpur Latest News
Updated on

नागपूर ः पुढील वर्षी महापालिका निवडणूक होणार असून शेवटच्या वर्षात भाजपने दयाशंकर तिवारी यांच्याकडे महापौरपदाची जबाबदारी दिली. एकप्रकारे संघाला संकटातून काढणाऱ्या ‘नाईटवॉचमन'चीच भूमिका त्यांना मिळाली आहे, अशी चर्चा यानिमित्त रंगली आहे. कमी षटकांत जास्त धावा काढण्‍याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

तिवारी यांचा रखडलेली विकास कामे, प्रशासनाकडून होणारी अडवणूक, ज्येष्ठ नगरसेवक सहकार्य करीत नसल्याचा पहिल्यांदाच निवडून आलेल्या पक्षातीलच नगरसेवकांचा झालेला समज आदी आघाड्यांवर कस लागणार आहे. तेरा महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेपुढे जाताना पक्षाची विकेट जाणार नाही, याबाबत त्यांना दक्ष राहावे लागणार आहे.

पदवीधर निवडणुकीत पराभवाच्या धक्क्यानंतर भाजपमधील दुफळी समोर आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये निराशेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या दयाशंकर तिवारी यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला. परंतु त्यांच्यापुढे महापौर म्हणून कामे करताना अनेक आव्हाने आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची री नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ओढल्याने प्रभागातील विकास कामे रखडली आहेत. सिवेज लाईन दुरुस्ती, रस्ता दुरुस्तीचीही कामे बंद असल्याने नागरिक नगरसेवकांच्या नावाने ओरडत आहेत.

परिणामी नागरिकांत नगरसेवकांविरुद्ध मते तयार होत असून पुढील मनपा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दयाशंकर तिवारी यांच्यापुढे पुढील तेरा महिन्यांचा कालावधीत आर्थिक संकटाने रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. एकीकडे राज्य सरकारने अनुदानातही हात आखडता घेतला आहे.

भाजयुमो अध्यक्ष ते महापौर

दयाशंकर तिवारी बालपणापासून स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. १९८८-९१ मध्ये भाजयुमोचे शहरअध्यक्ष,१९९२-९४ या काळात भाजप विद्यार्थी मोर्चाचे ते प्रदेश संयोजक होते. १९९५ ते ९७ भाजप शहरमंत्री, चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते म्हणून काम केले. त्यांनी २००४ मध्ये तत्कालीन मंत्री अनिस अहमद यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूकही लढविली.

विविध क्षेत्रात वावर

राजकीय क्षेत्रासह क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा वावर आहे. ते शहर बॉक्सिंग असोसिएशन, शहर आईस स्केटिंग असोसिएशन आणि शहर चेस बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तिवारी नागपुरातील संयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून नमकगंज येथील नित्यानंद कन्या विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय इतवारीतील नवीन ज्ञानविकास प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष, लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते मानकापूर येथील विश्वंभर शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे मतिमंद मुलींची शाळा चालविली जाते.

पाच वर्षांसाठी नागरिकांना जे वचन दिले होते, ते पूर्ण करण्याची क्षमता दयाशंकर तिवारी यांच्यात आहे. त्यांना ट्‍वेंटी-२० स्टाईलने काम करण्याची सवय आहे. सर्व नगरसेवक, प्रशासनाला सोबत घेऊन ते जनहिताचे काम करीत उत्कृष्ट ‘कॅप्टन' ठरतील. जनहिताच्या कामाच्या बळावर २०२२ मध्ये पुन्हा जनतेत जाऊन मत मागणार आहे अन् जनता पुन्हा सत्तेवर आणेल.
- प्रवीण दटके, 
आमदार, शहर भाजपाध्यक्ष.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.