YCMOU : समाजकार्याच्या महाविद्यालयातून मिळाली बीएसस्सीची पदवी ; `वायसीएमयू’चा अनागोंदी कारभार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या वतीने अभ्यासक्रमासाठी विविध महाविद्यालयांमध्ये केंद्र दिले आहे.
Nagpur
Nagpur sakal
Updated on

नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या वतीने अभ्यासक्रमासाठी विविध महाविद्यालयांमध्ये केंद्र दिले आहे. मात्र, हे केंद्र देताना जिथे अभ्यासक्रम नाही अशा ठिकाणीही केंद्र देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात वर्ध्यातील एका समाजकार्य महाविद्यालयातील वायसीएमयूच्या केंद्रातून चक्क काही विद्यार्थ्यांनी बीएस.स्सी.अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यापैकी एका मुलीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एम. एसस्सी. अभ्यासाकरिता अर्ज केला आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने केंद्र देताना, तो विषय महाविद्यालयात असल्याशिवाय केंद्र देता येत नाही. विशेष म्हणजे, त्या अभ्यासक्रमाचे शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तिथे असतात. त्याचा फायदा त्या अभ्यासक्रमाला होत असतो. मात्र, वर्ध्यातील एका समाजकार्य महाविद्यालयात विभागीय केंद्राद्वारे बीएसस्सी आणि एम.एसस्सी अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून हे अभ्यासक्रम केंद्रावर शिकविण्यात येत असल्याचे समजते.

मात्र, बीएसस्सी आणि एम.एसस्सी अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक असलेली उच्चतम प्रयोगशाळा आणि शिकविणारे शिक्षक नेमके आले कुठून? असा प्रश्‍न समोर आला आहे. याबाबत विभागीय केंद्राचे संचालक मेहरे यांना विचारणा केली असता, हे केंद्र पूर्वीपासून सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे, या महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालय नाही. शिवाय गेल्यावर्षी या महाविद्यालयात एक नवे फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. याबाबत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रमातील प्रयोगशाळेचा उपयोग केला जात असल्याचे स्पष्ट केले.

नेमका निकष लावला तरी काय?

कुठलेही महाविद्यालय केंद्र म्हणून निवडताना तो अभ्यासक्रम त्या महाविद्यालयात असणे आवश्‍यक आहे. मात्र, त्या महाविद्यालयात अभ्यासक्रम नसताना नेमक्या कोणत्या निकषावर तत्कालीन केंद्र संचालकांनी थेट समाजकार्य महाविद्यालयात केंद्र दिले हे कळायला मार्ग नाही.

परीक्षा विभागाला शंका

केंद्रातून बीएसस्सी अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठातील एम.एसस्सी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्रासाठी काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात विद्यार्थ्यांचे केंद्र एमएस.डब्लू असताना त्यांनी बी.एसस्सी अभ्यासक्रम कसा काय पूर्ण केला अशी शंका विद्यापीठाने व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.