सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी 

children did last rights of homeless Old woman in Nagpur
children did last rights of homeless Old woman in Nagpur
Updated on

नागपूर : सुनेने व नातवाने मारहाण करून तिला स्वतःच्याच घरून हाकलून दिले. कित्येक दिवस इकडेतिकडे भटकंती सुरू असतानाच एका तरुणीला ती रस्त्यावर दिसली. तिने लगेच निराधार मुलांच्या संस्थेला कळविले. संस्थेत तिची व्यवस्थित देखभाल सुरू असतानाच अचानक तिचा मृत्यू झाला. आप्तस्वकीयांनी दूर लोटलेल्या त्या म्हातारीवर नाइलाजाने संस्थेच्याच चिमुकल्यांना खांदा देण्याची दुर्दैवी वेळ आली.

ही दुर्दैवी कहाणी आहे नागपुरात राहणाऱ्या ८० वर्षीय यशोदा मारोती खडगीची. एकेकाळी यशोदाचा सुखी संसार होता. स्वतःचे घर होते, घरात मुलगा, सून, नातू सर्वकाही होते. मात्र अचानक कर्त्या मुलाचा मृत्यू झाला आणि यशोदाची दुर्दशा सुरू झाली. छोट्या छोट्या कारणांवरून सून व नातवाने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तिला शिवीगाळ, मारझोडही होऊ लागली. 

एकदिवस दोघांनीही यशोदाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. ज्यांच्यासाठी जीव लावला, त्यांनीच दूर लोटल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. आधाराच्या प्रतीक्षेत हिंडत असताना कुणीही तिला जवळ केले नाही. वृद्धाश्रमही ठेवायला तयार नव्हते. अखेर एका तरुणीचे (नीता) तिच्याकडे लक्ष गेले. तरुणीने लगेच रोठा (जि. वर्धा) येथील उमेद संकल्प संस्था चालविणाऱ्या मंगेशी मून हिला फोन करून मदत मागितली. दुसऱ्याच दिवशी मंगेशी आणि 'गरज फाऊंडेशन'च्या मिनुश्री रावत व तिच्या टीमने यशोदाला नागपूरवरून प्रकल्पावर आणले.

यशोदाची विचारपूस केली असता, ती काहीही सांगायला तयार नव्हती. केवळ सून व नातवाने घराबाहेर काढले एवढेच तिने सांगितले. मानसिक धक्क्यामुळे ती अक्षरशः वेडी झाली होती. कुणाला ओळखत नव्हती. अन्नपाणीही सोडले होते. अशा परिस्थितीत ‘उमेद’ने तिला मदतीचा हात दिला. 

‘उमेद’च्या चिमुकल्यांनी महिनाभर यशोदाला खाऊपिऊ घातले, उपचार केलेत. मात्र त्याउपरही तिची तब्येत खालावत गेली. अखेर आज, शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिस चौकशीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे ‘उमेद’च्या छोट्याछोट्या मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी तिला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.

'माझ्या मैत्रिणीने यशोदा आजीविषयी सांगितल्यावर आम्ही तिला घेऊन आलो. आमच्या परीने तिची सेवा करून तिचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने त्यात यश आले नाही. त्यामुळे नाइलाजाने आमच्या मुलांनाच तिला खांदा देण्याची वेळ आली. आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. '
-मंगेशी मून, 
संस्थापक, उमेद संकल्प संस्था 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.