नागपूर : जवळपास अर्धा हिवाळा संपूनही अद्याप पाहिजे तशी थंडी पडत नसल्याची चर्चा नागपूरसह(Nagpur) संपूर्ण विदर्भात कालपर्यंत होती. मात्र आज अचानक वातावरण बदलून कडाक्याची थंडी जाणवली. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात तब्बल सहा अंशांची घट होऊन पारा नीचांकी ७.८ डिग्रीवर (degrees) आला. केवळ विदर्भातच नव्हे, संपूर्ण राज्यात रविवारची रात्र सर्वाधिक थंड राहिली. विदर्भात आणखी दोन दिवस थंडीची तीव्र लाट राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पहाडी भागांत सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव नागपुरात दिसून आला. गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या किमान तापमानात तब्बल सहा डिग्रीची घसरण होऊन पारा १३.४ वरून ७.८ डिग्रीवर आला. विदर्भासह राज्यातही सर्वात कमी तापमानाची नोंद नागपुरातच झाली.
यंदाच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. वर्षभरापूर्वी याच दिवशी नागपूरचे किमान तापमान ८.६ पर्यंत घसरले होते. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरखालोखाल अमरावती येथे ८.०, गोंदिया येथे ८.२ आणि वर्धा येथे ९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट जाणवत आहे.
गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त आहेत.
रात्री व पहाटेच्या सुमारासच नव्हे, दिवसाही हुडहुडी जाणवते. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. थंडीचा सर्वाधिक प्रभाव सध्या ग्रामीण भागांत जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्या व ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. अचानक थंडी वाढल्यामुळे एसी बंद झाले असून, पंख्यांचीही स्पीड कमी झाली आहे. शहरात सोमवारी थंडीचीच जागोजागी चर्चा आहे.
आणखी दोन दिवस अलर्ट
हवामान विभागाने विदर्भात आणखी दोन दिवस अलर्ट दिल्याने थंडीचा जोर कायम राहणार आहे. उत्तर भारतात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने तापमानात वाढ होऊन २२ डिसेंबरनंतर थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तथापि नववर्षाची रात्रही कडाक्याच्या थंडीत साजरी करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहे.
तीन वर्षांपूर्वी गेला होता नागपूरचा पारा ३.५ डिग्रीवर
गेल्या शंभर वर्षांतील थंडीच्या इतिहासावर नजर टाकल्यास नागपूर व विदर्भातील पारा अनेकवेळा दहाच्या खाली आलेला आहे. तीन वर्षांपूर्वी (२९ डिसेंबर) नागपूरचा पारा तब्बल ३.५ अंशांपर्यंत घसरला होता, जो आजवरचा विक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन हेही झुंड चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने नागपुरातच होते. त्यांनी विदर्भातील थंडीविषयी ट्वीट करून आश्चर्य व्यक्त केले होते. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता तो विक्रम इतिहासजमा होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे.
स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांवर गर्दी
वाढत्या थंडीमुळे स्वेटर्स, जॅकेट, जर्किन्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडले असून, स्वेटर्स विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे चांगली कमाई होत असल्यामुळे दुकानदारही खुश आहेत. थंडीमुळे श्वसनाच्या आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने या दिवसांत नागरिकांनी विशेषतः लहान मुले व वृद्ध मंडळींनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसा डॉक्टरांचा सल्ला आहे.
विदर्भातील - किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर - ७.८, अमरावती - ८.०, गोंदिया - ८.२, वर्धा - ९.०, ब्रम्हपुरी - १०.०, चंद्रपूर - ११.४, गडचिरोली - ११.६, अकोला - ११.३, बुलडाणा - १०.५, यवतमाळ - १२.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.