'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'चा फज्जा, संपर्कातील हजारो रस्त्यावर

Corona
CoronaTeam Esakal
Updated on

नागपूर : कोरोनावर नियंत्रणासाठी बाधितांच्या संपर्कातील नागरिकांना शोधणेही महत्त्वाचे आहे. परंतु बाधितांचा अहवाल सहा सहा दिवस मिळत नसल्याने 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चा शहरात पुरता बोजवारा उडाला आहे. बाधितांच्या संपर्कातील नागरिक विविध कार्यालयात, अत्यावश्यक सेवेच्या दुकानांत बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे नियंत्रणाऐवजी कोरोनाचा उद्रेक वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

शहराला कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. हा विळखा सैल करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनेक पर्यायापैकी एक आहे. परंतु, २४ तासांत बधिताला त्याने केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळत नसल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांना कसे शोधणार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही महापालिकेला सापडले नसल्याचे चित्र आहे. दररोज १५ ते २० हजारावर चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचे अहवाल २४ तासांत मिळाल्यास बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे सहज शक्य आहे. संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्यास सांगून त्यांच्यावरही तत्काळ उपचार सुरू करणे शक्य आहे. परंतु, तीन ते सहा दिवसांपर्यंत अहवालच मिळत नसल्याचे पुढे आले आहे. पारडी येथील सुभाष मैदान येथील महापालिकेच्या चाचणी केंद्रावर अमित मस्के यांनी ९ एप्रिलला चाचणी केली होती. काल १४ एप्रिलपर्यंत त्यांचा अहवाल आला नव्हता. वेळेत अहवाल येत नसल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. अहवालच नसल्याने कोरोनाची साखळी तोडणे प्रशासनालाही अशक्य झाले आहे.

हेही वाचा - भीषण वास्तव! सभोवताली मृतदेहांची गर्दी अन् हाताळणारे फक्त चारच जण

केंद्रीय पथकाच्या सूचना हवेत

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच केंद्राचे पथक शहरात आले. या पथकाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केल्या. त्याच्या सूचनाही हवेतच उडाल्याचे चित्र आहे.

व्हिटीएम किट संपुष्टात, चाचणी केंद्र बंद

महापालिकेने तीन दिवस आरटीपीसीआर चाचण्या बंद केल्या होत्या. आजपासून महापालिकेच्या विविध केंद्रांवर चाचण्या सुरू झाल्या, परंतु तासाभरातच केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना रित्या हाताने परत जावे लागले. मनपाच्या केंद्रावर चाचणीसाठी आवश्यक व्हीटीएम किट्स संपुष्टात आल्याचे सूत्राने नमूद केले.

हेही वाचा - 'कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोरोना चाचणी करावी'

खासगी लॅबही थकल्या

नागरिक मोठ्या संख्येने चाचणी करीत असल्याने खासगी लॅबवरही ताण वाढला आहे. येथेही नागरिकांना २४ तासांत अहवाल मिळत नाही. आज तर खासगी लॅबमधील व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम किट संपल्याचे एका खासगी लॅब संचालकाने नमूद केले. त्यामुळे खासगीला प्राधान्य देणाऱ्यांनाही चाचणी करता आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.