नागपूर ः कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच म्हाडा कॉलनीचे बांधकाम बाधित मजूर करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे हे मजूर किराणा, भाजीपाला घेण्यासाठी कॉटन मार्केट, गणेशपेठ येथे मुक्तपणे संचार करीत आहे. यातील काही मजूर होळीनिमित्त मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील त्यांच्या गावी रेल्वेने गेल्याची संतापजनक घटनाही पुढे आली.
गीता मंदिरसमोरील गुजरवाडी परिसरात म्हाडा कॉलनीचे बांधकाम सुरू असून येथे ३०० मजूर कार्यरत आहेत. हे सर्व मजूर याच परिसरात कामगार वसाहतीत वास्तव्यास आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने येथे विशेष चाचणी शिबीर घेतले होते. यात सहा कामगार बाधित आढळून आले. इतर सहा जणांना पुन्हा चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. बाधित रुग्णांना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. परंतु बाधित मजूरासंह इतरही मजूर बांधकाम करीत असल्याचे मनोज साबळे यांनी नमुद केले.
एवढेच नव्हे हे मजूर दररोजच्या गरजेनुसार किराणा, भाजीपाला खरेदीसाठी कॉटन मार्केट, गणेशपेठ, गुजरवाडी भागात मुक्त संचार करीत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबत महापौर दयाशकंर तिवारी यांना फोनवरून माहिती दिली. महापौर तिवारी यांनी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. पोवाने, उपद्रव शोध पथक आणि मनपाच्या आर.आर.टी. पथकासह कामगार वसाहत गाठली.
या ठिकाणी बहुतांश मजूर मास्कशिवाय आढळून आले. यावर महापौरांनी तत्काळ म्हाडा व्यवस्थापनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बोलावले. परंतु तेही तेथे उपस्थित नसल्याने फोनवरून महापौरांनी चर्चा केली. याप्रकऱणी म्हाडा व्यवस्थापनातील अधिकाऱ्याने कंत्राटदारावर सर्व ढकलले.
बाधितांपैकी दोघेच उपस्थित, इतर गावांकडे
यावेळी येथील एकूण सहा बाधितांपैकी केवळ दोघेच कामगार वसाहतीत असल्याचे आढळून आले. इतर चौघांबाबत चौकशी केली असता ते उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील त्यांच्या गावी गेल्याचे पुढे आले. त्यामुळे रेल्वेत तसेच त्यांच्या गावातही ते सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे.
कंत्राटदाराची महापौरांना हुलकावणी
महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हाडा अधिकाऱ्यांकडून मजूर कंत्राटदाराचा फोन क्रमांक घेतला. तिवारी यांनी लेबर कंत्राटदाराला फोन केला असता त्याने १५ मिनिटांत पोहोचतो, असे सांगितले. परंतु त्यानंतर त्याने फोन बंद केला.
म्हाडा व्यवस्थापनाला नोटीस
महापौर दयाशंकर तिवारी यांनी या हलगर्जीपणाबद्दल म्हाडा व्यवस्थापनाला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. म्हाडाकडून सविस्तर माहितीचा अहवाल आल्यानंतर दंडात्मक तसेच पोलिस कारवाई करण्याचे निर्देशही महापौर तिवारी यांनी दिली.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.