बाजारगाव (नागपूर) : येथून 5 किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील चौदा मैल व्याहाड येथे आज 54 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला नागपूर येथील सतरंजीपुरा येथे मयतीला गेली होती. एक-दोन दिवस तिथे राहून स्वत:च्या गावी चौदा मैल व्याहाड येथे परत आली. राष्ट्रीय महामार्गावर तिच्या मुलाचे मोबाईलचे दुकान असल्याने ती नेहमीच दुकानात असायची. त्यामुळे ती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होती. काल 4 जूनला महिलेची प्रकृती खराब झाली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. लक्षणे बघून त्यांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. कोरोना चाचणी घेण्यात आली.
आज (ता. 5) सदर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळमेश्वर तालुका येथील आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपाली कुलकर्णी या आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. तसेच खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहायक पोलिस निरीक्षक राजू कर्मलवार, आरोग्य विस्तार अधिकारी दिनू गतफने, तहसीलदार सचिन यादव हेही घटनास्थळी पोहोचले. सर्व माहिती घेऊन तिन्ही परिवारातील 18 जणांना नागपूर येथिल सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीला क्वारंटाइनसाठी पाठविण्यात आले. परिसरात सील करण्यात आला.
बालिकेने केली कोरोनावर मात
कोंढाळी : दुधाळा येथील नऊ वर्षीय बालिकेने कोरोनावर मात केली. त्यामुळे तिच्यासोबत असलेले आईवडील व भाऊ अशा पाच रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती कोंढाळीचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील येरमल यांनी दिली. काटोल तालुक्यातील कोंढाळीनजीकच्या दुधाळा येथील एका कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी नव वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाली होती. तिला नागपूर येथील आमदार निवासातील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे आईवडील व भाऊ या सर्वांनाही आमदार निवासात सामूहिक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते.
उपचारा दरम्यान बालिकेसोबत क्वारंटाइन करण्यात आलेल्या 32 लोकांची चाचणी निगेटिव्ह आली होती. 14 दिवस उपचारानंतर बालिकेचा दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. दरम्यान, दुधाळा येथील कंटेन्मेंट झोन हटविण्याची मागणी तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार नीलेश कदम यांनी दुधाळा येथे भेट दिली असता नागरिकांनी केली.
लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह
लोकमान्य नगरात पुन्हा एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली. एक दिवसापूर्वी मेडिकल दुकानदाराच्या घरी राहणारी किरायादार महिला आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह आली होती. आज याच घरातील मुलगा पॉझिटिव्ह आला. आता लोकमान्य नगरातील बाधितांची संख्या एकूण नऊ झाली आहे. पहिल्याच दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लोकमान्य नगर सील केले आहे.
गजानन नगरात एक बाधित
वानाडोंगरी परिसरात गजानन नगर येथे आज एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर सील केला आहे. लोकमान्य नगरात एकूण नऊ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. हा परिसर निलडोह ग्रामपंचायत आणि डिगडोह ग्रामपंचायत परिसर होता. आता हळूहळू वानाडोंगरीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आता या परिसरात बाधितांची संख्या दहा झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.