नागपूर : कोरोनावर लसीचे संशोधन सुरू असतानाच कोरोनावर नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न सुरू होते. त्यात नागपुरातील असद हसन हा तरुणही मागे नव्हता. सारे जग कोरोनाशी लढत असताना त्यावर उपायासाठी असदचा संघर्ष सुरू होता. काही दिवसांमध्येच त्याने परंपरागत ओझोनेटर्सपासून कोरोनाला नियंत्रित करू शकणारे अत्याधुनिक एअर प्युरिफायर ओझोनेटर तयार केले.
अख्ख जग विळख्यात घेणाऱ्या कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळमध्ये आढळला होता. त्यावेळी कोरोना देशाला कवेत घेईल, असे कुणालाही वाटले नसेल! त्यानंतर देशात कोरोनाने थैमान घातले अन् देश हादरला. आरोग्य यंत्रणेचेही पितळ उघडे पडले. कुणी थंडीत कोरोना पळून जाईल तर कुणी उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे कोरोनाचा विषाणू राहणारच नाही, असे भाकीत व्यक्त केले. मात्र, कोरोनाचा कहर वाढतच गेला. अनेक शास्त्रज्ञ, संशोधकांनी कोरोनावरील लस शोधण्याच्या कार्यात स्वतःला मग्न केले. आता कोरोनावर उपचारासाठी लसही आली आहे.
कोरोनाच्या काळात नागपुरातील असद हसन या एमएससी एन्व्हायर्मेट करीत असलेल्या तरुणानेही कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी परंपरागत ओझोनवर आधारित एअर प्युरिफायर तयार केले. नागपुरातील काही डॉक्टरांकडे ते लावण्यात आले. एकीकडे लसीकरण सुरू असतानाच पुन्हा कोरोनावर नियंत्रणासाठी निर्बंध सुरू झाले आहे. परंतु, हे निर्बंध पूर्णतः नसल्याने वाढत्या कोरोनातही बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढली आहे. गर्दी वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला आहे. मात्र, या गर्दीवर कोरोनाचा प्रभाव होऊ नये, यासाठी असद हसनने तयार केलेले ओझोनेटर काही प्रमाणात दिलासादायक ठरत आहे.
विशेष म्हणजे तरुणाने विविध ठिकाणी ते वापरण्यास दिल्यानंतर त्याची विक्रीही सुरू केली. या ओझोनेटरला परदेशातूनही मागणी आहे. सुरुवातीला असदने काही वैद्यकीय संस्थांकडे ते वापरण्यासाठी दिले. त्यांनीही ओझोनच्या तीव्रतेने कोरोनाचा विषाणू दूर ठेवण्यास मदत होत असल्याची पावती दिली. या तरुणाला काकाच्या परंपरागत ओझोनेटर्स तयार करण्याच्या व्यवसायातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्ग सापडला.
गुजरातमध्ये काकाकडे काही दिवस राहून ओझोनेटर्स कसे तयार करतात, याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यात कोरोनाच्या पार्शभूमीवर आणखी सुधारणा करण्यासाठी जगभरातील ओझोनबाबतचे संशोधन, त्याचा वापराबाबतचे दस्तऐवज चाळले. कोरोना विषाणूचा अभ्यास केला. देश-विदेशातील कोव्हिड काळात सुरू असलेले तंत्रज्ञान, त्याच्या अहवालाचे वाचन केले. या अभ्यासाअंती त्याने नवेच ओझोनेटर तयार केले. कोरोना विषाणूवर नियंत्रणासाठी त्याने ओझोनेटरमध्ये ओझोन सेल क्वालिटी वाढविली. परंपरागत सर्किट बोर्ड काढून नवीन तीव्रतेचा सर्किट बोर्ड तसेच ट्रान्सफॉर्मरच्या दर्जात सुधारणा केली. पूर्णपणे भारतीय साधनांचा वापर करण्यात आला.
असा संपतो कोरोनाचा विषाणू
कोरोनाचा विषाणू टेबल आदींच्या पृष्ठभागावर असतो. त्याचप्रमाणे वातावरणात असलेल्या हजारो सुक्ष्मकणाच्या पृष्ठभागावरून त्याचा प्रसार होऊ शकतो. जेथे ओझोनेटर लावले आहेत, तेथे कोव्हीड विषाणूचा प्रसार होत नसल्याचा दावा असदने केला. विषाणूच्या डीएनएभोवती एक आवरण असते. ओझोन त्या आवरणाला ‘ऑक्सीडाईज्ड’ करून ‘ब्रेक’ करते. त्यामुळे कोव्हीड विषाणूचा प्रसार रोखता येणे शक्य असल्याचे असदने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.