नागपूर : जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. परंतु, मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. ज्या समाजामध्ये स्त्रियांवर अजूनही अत्याचाराचे सावट आहे त्याच समाजात एक दृष्टिहीन स्त्री आत्मविश्वासाचे अंजन डोळ्यात घालून विजयाची मशाल पेटविते हे खरोखरच प्रत्येक स्त्रीसाठी गौरवांकित करण्यासारखे आहे. खरंतर एकविसावं शतक आलंय तरी अजूनही स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न आमच्यासमोर कायम असताना एका नेत्रहीन मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे मायबाप खरोखर धन्य होय.
अडथळ्यांची शर्यत पार करीत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होणाऱ्या नेत्रहीन प्रांजल पाटील म्हणजे धारदार संघर्षातून स्वतःला निर्माण करणारी आजची ‘सावित्री’. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रांजल पाटील या नेत्रहीन झाल्या. परंतु, त्यांनी त्या अंधारालाच उजेडाची वाट दाखवित जगण्याला दिशा दिली. त्यांच्याजवळ दृष्टी नव्हती पण दूरदृष्टी होती आणि म्हणूनच साऱ्या संकटावर मात करीत देशातल्या पहिल्या नेत्रहीन महिला आयएएस होण्याचा त्यांनी मान पटकविला.
मूळच्या उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी मुंबईतील दादर येथील श्रीमती कमला मेहता शाळेतून शिक्षण घेतले. ब्रेल लिपीत या शाळेत शिकविले जाते. प्रांजल यांनी येथूनच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर चंदाबाई कॉलेजमधून त्यांनी कला शाखेतून शिक्षण घेत बारावीला त्या ८५ टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईतीलच सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतले आणि अंधत्वावर मात करीत एम. ए, एम.फील पर्यतची पदवी घेतली.
स्त्रियांच्या ३३ टक्के आरक्षणासाठी जो समाज झगडतो त्याच समाजातले असंख्य यक्षप्रश्न प्रांजल यांच्यासमोर उभे होते पण कुठलंही आरक्षण न मागता सामान्य म्हणून जगण्याची त्यांची धडपड कायम होती. महाविद्यालयात जाण्यासाठी प्रांजल उल्हासनगर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंतचा प्रचंड गर्दीचा अवघड प्रवास रोज करीत होत्या पण त्यांनी कधी दया, सहानुभूती यांना जवळ केले नाही. जगण्याची आणि शिकण्याची धडपड त्यांचा सातत्याने आत्मविश्वास वाढवीत होती आणि स्वप्नांना उभारी देत होती.
कर्तृत्वाचा सह्याद्री जिंकला
पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रांजल पाटील आणि त्यांच्या मित्राने पहिल्यांदाच यूपीएससंबंधी एक लेख वाचला आणि बस मनाशी खूणगाठ बांधली आयएएस अधिकारी होण्याची. दिल्लीतून दृष्टिहीन लोकांसाठी असलेल्या ‘जॉब ॲक्सेस विथ स्पीच’ या विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रांजल यांनी यूपीएससी अभ्यासाला सुरुवात केली. आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ७७३ व्या क्रमांकाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण रेल्वे विभागात तुझ्यासाठी योग्य काम नसल्याचे सांगून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखविला. तरीही प्रांजल मागे हटल्या नाही. सेवेतच काम करण्याचा अट्टहास त्यांनी धरला आणि हक्काची पोस्ट न देणाऱ्या व्यवस्थेला त्यांनी आपल्या यशाने चपराक लावली. २०१७ मध्ये रँक सुधारित त्या १२४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा मारीत असतानाच त्यांनी परीक्षेची तयारी करीत कर्तृत्वाचा सह्याद्री जिंकला.
जिजाऊ सामर्थ्यशील ठरली
प्रतिभेने स्वतःचे विश्व प्रांजल यांनी चमकावून दाखविले. तिरुअनंतपुरम येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी पहिल्यांदा त्या नियुक्त झाल्या. प्रशासकीय कामाचा पहिल्यांदाच अनुभव घेताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. केरळमध्ये आलेल्या पुराच्या संकटाला त्यांनी यशस्वीरीत्या तोंड दिले. पुरात अडकलेल्या लोकांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत मानसिक धीर देऊन केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणूनच नव्हे तर माणूस होण्याची जबाबदारीही निभावली. त्यानंतर दिल्लीत सहाय्य्क जिल्हाधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या. तोच कोरोनाचा लढा सुरू झाला. तिथेही ही जिजाऊ सामर्थ्यशील ठरली. वैद्यकीय सेवेपासून ते अन्नधान्य पुरविण्यापर्यंत त्या कुठेही कमी पडल्या नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.