नागपूर :ऑगस्टची घटना. सायंकाळचा प्रहर. वर्धा येथून नागपूरच्या दिशेने निघालेली बस रस्त्यावरून धावत असताना अचानक एका व्यक्तीला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते भोवळ येऊन खाली पडले. बसमध्ये एकच गलका केला गेला.
खाली कोसळलेल्या व्यक्तीच्या सभोवताल गोळा झाले, परंतु कोणीही पुढे येत नव्हते. हात लावला तर पोलिसांचा ससेमिरा लागतो ही भीती साऱ्यांच्या मनात होती. मात्र बसच्या गर्दीत एक इंजिनीअरिंगची विद्यार्थ्यानी पुढे आली. छातीवर दाब देत पंपींग केले. वैद्यकीय भाषेत त्याला सीपीआर म्हणतात.
हृदयविकाराचा झटका आल्यास ‘तुम्ही वाचवू शकता एक जीव’
काही अवधित बेशुद्धावस्थेतील व्यक्तीचे हृदय धडकू लागले. ते शुद्धीवर आले. त्यांना स्वास्थम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्या व्यक्तीचा जीव वाचला. छातीवर दाब देणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव अंकिता असून स्वास्थमतर्फे तिचे कौतुक करण्यात आले.
स्वास्थ्यम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तसेच प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी हा घडलेला प्रसंग ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात सांगितल्यानंतर जीव वाचवणाऱ्या अंकिताचे धाडस उपस्थितांच्या काळजावर कोरले गेले. आपणही असा एक जीव वाचवू शकतो, हा विचार मनात येताच...डॉ. हरकुट म्हणाले, ‘तुम्ही एक जीव वाचवू शकता..’ मॉलमध्ये, रस्त्यावर किंवा घरी हृदयविकाराचा झटका आल्यास रक्तपुरवठा बंद होतो.
काही अवधित मेंदूचाही रक्तपुरवठा बंद होतो. मात्र या दरम्यानच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने छातीवर दाब देत राहिल्यास (सीपीआर) जीव वाचू शकतो. श्वास परत आल्यानंतर तत्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवावे आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. सकाळ संवाद कार्यक्रमात डॉ. सोहन पराते, डॉ. योगेश कोळमकर आणि डॉ. पूनम हरकुट आणि डॉ. अभिजित रोकडे सहभागी झाले होते.
दोन हजार जणांना प्रशिक्षण
या उपक्रमाअंतर्गत सीपीआर प्रशिक्षणातून तुम्ही एक जीव वाचवू शकता असा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी स्वास्थम हॉस्पिटलतर्फे होणाऱ्या शिबिरात २ हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात या प्रशिक्षणाची साखळी सुरू राहणार असल्याचे संवादातून पुढे आले.
हृदय विकाराची कारणे काय ?
रक्तवाहिन्यांत अडथळा येणे
रक्तवाहिनीमध्ये चरबी जमा होत असल्याने कोलेस्ट्रोल वाढते
अनुवांशिकता हा आपल्याला न टाळता येणारा घटक
हृदयाची रक्तवाहिनी अचानक आंकुचन पावणे
रक्ताची गाठ रक्तप्रवाहाबरोबर जाऊन रक्तवाहिनी बंद करते
ताण (स्ट्रेस) • धुम्रपान (स्मोकिंग)
साखर (शुगर) • मिठ (सॉल्ट)
आठ तासांची बैठी जीवनशैली
प्रथमोपचाराने मिळू शकते जीवनदान
आकस्मिक हृदयविकाराचा झटका आल्यास जीव वाचवण्यासाठी प्रथमोपचार केल्याने जीवनदान मिळू शकते. यासाठी सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम, हृदय दिनाच्या पर्वावर २९ सप्टेंबरला उपराजधानीतील ‘झिरो माईल’ येथील मेट्रो स्टेशन परिसरात सकाळी ११ ते ४ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. १५ मिनिंटाचे प्रशिक्षण घ्यावे आणि जीव वाचवण्याचे सत्कर्म करावे असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी केले.
घाईगडबडीत हृदयाचाच काय तर शरीराच्या कोणत्याही अवयवाचा विसर पडू नये. दर दिवसाला १० हजार पावले चालणे-फिरणे, धावणे, रोजची कामे करणे, ताण कमी करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे हे निरोगी आरोग्याचे मेरूमणी आहेत. आहार, विचार, दिनचर्या, व्यायाम आणि ताणतणावमुक्ती ही पंचसूत्री प्रत्येकाने आयुष्यात अमंलात आणावी.
- डॉ. पकंज हरकुट, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ तसेच संचालक- स्वास्थम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.