नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिखली चौकात राहणाऱ्या जितेन निषाद नामक ८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी रात्री दहा वाजता समोर आली. कळमना पोलिसांसह शहरातील सर्वच पोलिस पथकांनी संपूर्ण यंत्रणेसह पाच तासात चिमुकल्याचा शोध लावून सहा जणांना अटक केली. घटनेचा मुख्य सुत्रधारासह अपहरण करणारे दाम्पत्य असे तीन जण अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
फरजाना उर्फ असार कुरेशी (वय ४० रा. कुंदनलाल गुप्तानगर), सीमा परवीन अब्दुल रुउफ अंसारी (वय ३८ रा. विनोबा भावेनगर), बादल धनराज मडके (वय ३५, रा, करीबाग, भोसलेवाडी, पाचपावली), सचिन रमेश पाटील (वय ४५ रा. इंदोरा मॉडल टाऊन, जरीपटका) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकरणातील मुख्य सुत्रधार श्वेता खान (रा. बालाघाट) हिच्यासह योगेंद्र प्रजापती (रा. कोटा राजस्थान), रिटा प्रजापती फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या चिखली झोपडपट्टी येथे राहणाऱ्या राजकुमारी राजू निषाद यांच्या ८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार रात्री १० वाजता कळमना पोलिसांकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली. दरम्यान आरोपींची माहिती घेतली असता, योगेंद्र आणि रिटा प्रजापी नामक दाम्पत्य १५ दिवसांपूर्वी राजकुमारी निषाद यांच्या घरासमोर भाड्याने वास्तव्यास आल्याचे समजले. त्यांच्यासोबीत दोन मुलेही होते. दरम्यान गुरुवारी सकाळी राजू नोकरीवर गेला. याशिवाय राजकुमारी ही सुद्धा धुणीभांडी करण्याचे काम करीत असल्याने कामावर गेली. तेव्हा तिने जितेन या चिमुकल्यास आपल्या आत्याकडे ठेवले. दुपारी घरी परत आल्यावर ती त्याला परत घेऊन आली.
अपहृत चिमुकला पाच तासात गवसला
मात्र, स्वयंपाक करताना, तो त्रास देईल या भीतीने त्याला बाहेर सोडले. यादरम्यान योगेंद्रने त्याला फिरायला घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला. मात्र, दुपार आणि सायंकाळ झाली तरी जितेनला घेऊन योगेंद्र परत न आल्याने त्यांनी विचारपूस केली. तेव्हा त्याची पत्नी रिटा आणि दोन मुलेही घरी नसल्याचे समजले. त्यातून त्यांनी कळमना पोलिसांकडे मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.
तपासात पोलिसांनी कॉल डिटेल्स, सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत, बिनाकी येथून फरजाना उर्फ असार कुरेशी हिला ताब्यात घेतले. तिच्या आधारे ऑटोचालक बबलू उर्फ बादल धनराज मडके आणि सचिन पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांनी चिमुकल्याला नागपुरातील दाम्पत्याला अडीच लाखात विकल्याची माहिती दिली. तेव्हा लगेच त्याच्याकडून दाम्पत्याला ताब्यात घेत, चिमुकल्याला राजकुमारी यांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी दाम्पत्य आणि त्यांच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिस आयुक्तांनी सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
एक लाखाचा पुरस्कार
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित, परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त संदीप पखाले, तपासात यशोधरानगर, कळमना, पारडी, युनिट ५ आणि युनिट २ चे पथक यांनी कामगिरी पार पाडली. अवघ्या काही तासात प्रकरणाचा उलगडा केल्याने त्यांना पोलिस आयुक्तांनी एक लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली. यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले.
मोठे रॅकेट असल्याची शंका
अपहरण करणारे योगेंद्र आणि पत्नी रिटा हे दाम्पत्य यापूर्वी भंडारा, गोंदिया, छिंदवाडा, कोटा, बालाघाट या परिसरात अशाच प्रकारचे वास्तव्यास होते. चिखली झोपडपट्टीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर हे समोर आल्याने त्यांनी या परिसरातही अशाच प्रकारे मुले पळविली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रकरणात मुख्य सुत्रधार असलेल्या श्वेता खान हिच्यावर यापूर्वीही २ गुन्हे दाखल असल्याने राज्याबाहेरही या प्रकरणाची पाळेमुळे असल्याची शंका पोलिस आयुक्तांनी व्यक्त केली.
घरच्यांसोबत वाढविले संबंध
योगेंद्र चिखली येथे वास्तव्यास येण्यापूर्वी कळमना परिसरात एका लॉजवर वास्तव्यास होता. तिथे असलेले व्यवस्थापक प्रकाश बुरेवार याला त्याने कुठे घर भाड्याने मिळेल काय? अशी विचारणा केली. यावेळी त्याने चिखली झोपडपट्टी येथे घर असून तिथे दोघांना त्यांच्या मुलासोबत दोन हजार रुपये भाड्याने वास्तव्य करण्यासाठी खोली दिली. यावेळी समोरच राजू निषाद यांचे कुटुंब चार मुलांसह वास्तव्यास होते. दरम्यान योगेंद्रने त्यांची परिस्थिती लक्षात घेत, त्यांच्याशी संबंध वाढविण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने दिवाळीला त्यांच्या मुलांना गिफ्ट आणि कपडेही घेऊन दिले. यातून त्यांचा विश्वास बळावल्याने त्याचा फायदा घेत, जितेन या आठ वर्षीय बालकाचे अपहरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.