सिंदेवाही : पैशाच्या कारणावरून नातवाने आजोबाची हत्या करून त्यांचा मृतदेह घरातच पुरविला. मुलीच्या तक्रारीवरून तब्बल महिन्याभरानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नातू सूरज सुधाकर सेलकर याला अटक केली आहे. मृताचे नाव कवडू देठे (वय ७५, रा. लाडबोरी) असे आहे.
सिंदेवाहीपासून तीन किलोमीटर अंतरावर लाडबोरी हे गाव आहे. याच गावात कवडू देठे हे राहत होते. त्यांचा बैलविक्रीचा व्यवसाय होता. यातून ते सधन झाले. त्यांचा नातू सूरज सेलकर हा त्यांच्याकडे राहायचा. त्याला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो आजोबांकडे वारंवार दारूसाठी पैशांची मागणी करायचा. मात्र, आजोबा सूरजला पैसे देत नव्हते. पैशाच्या कारणावरूनच आजोबा-नातू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. गेल्या पाच जानेवारी रोजी पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून सूरजने कुऱ्हाडीच्या दांड्याने आजोबा कवडू देठे यांच्या डोक्यावर वार करून हत्या केली.
त्यानंतर हा प्रकार कुणाला कळू नये, यासाठी त्यांचा मृतदेह जमिनीत पुरला. दरम्यान, मूल तालुक्यातील बेंबाळ येथे राहत असलेली त्यांची मुलगी नंदा सेलकर ही दोन-तीन दिवसांआधी लाडबोरी येथे आली. तिला घरी वडील दिसले नाही. तिने नातू सूरज सेलकर याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला घरात रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे तिला मुलावर संशय आला. तिने मंगळवारी (ता. २२) थेट सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच लाडबोरी गाठून देठे यांच्या घराची तपासणी केली. तेव्हा घरात रक्ताचे डाग दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच नातू सूरज सुधाकर सेलकर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आजोबाची हत्या केल्याचे सांगून जमिनीत त्यांचा मृतदेह पुरल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सूरज सेलकर याला अटक केली आहे. घटनेचा तपास सिंदेवाही पोलिस करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.